नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने पंजाबात कॅ. अमरिंदर सिंग यांची पंजाब लोक कॉंग्रेस व सुखदेवसिंग धिंडसा यांचा संयुक्त अकाली दल या पक्षांशी युती केली असून त्या युतीचे जागा वाटप निश्चीत झाले आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नढ्ढा यांनी आज दिली.
ते म्हणाले आमच्या तीन पक्षांमध्ये झालेल्या समझौत्यानुसार भाजप पंजाबात 65 जागा लढणार असून कॅ. अमरिंदरसिंग यांच्या पक्षाला 35 जागा आणि धिंडसा यांच्या पक्षाला 17 जागा देण्यात आल्या आहेत. यावेळी नढ्ढा यांनी सांगितले की, आमची आघाडी राज्यात सत्तेवर आली तर राज्यातील माफिया राज आम्ही नाहीसे करू, पंजाबला पुन्हा विकासाच्या रूळावर आणण्याची गरज असून आम्ही हे काम निश्चीतपणे करू असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यात आम्हाला चांगले यश मिळेल असा विश्वासही नढ्ढा यांनी व्यक्त केला आहे. 1984 च्या शिख विरोधी दंगलीबद्दल ते म्हणाले की पंतप्रधान मोदींनी त्यासाठी एसआयटी नेमली असून त्यामुळे या दंगलीतील आरोपी आज तुरूंगात आहेत. नढ्ढा यांच्या पत्रकार परिषदेला पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ अमरिंदरसिंग, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, सुखदेवसिंग धिंडसा आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत हेही उपस्थित होते.
नढ्ढा म्हणाले की पंजाब हे राज्य पाकिस्तानच्या सीमेलगत असलेले राज्य असल्याने येथे सुरक्षा हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी राज्यात मजूबत राष्ट्रीय विचारांचे सरकार असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी आमची आघाडी निश्चीतपणे पार पाडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.