नवी दिल्ली – देशाच्या ईशान्य भागातील तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसने सोमवारी निरीक्षक निश्चित केले. पक्षाने ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक यांच्यावर तिन्ही राज्यांमधील निवडणुकांसाठी वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे.
नवीन वर्षाच्या फेबुवारीत मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅंड या तीन राज्यांत निवडणुका होतील. त्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन कॉंग्रेसने तिन्ही राज्यांसाठी प्रत्येकी दोन निरीक्षकांची नियुक्ती केली.
त्यानुसार, बेन्नी मेहनान आणि जे.डी.सीलम मेघालयचे काम पाहतील. गोव्याचे माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस्को सार्दिन्हा आणि खासदार के. जयकुमार नागालॅंडची जबाबदारी सांभाळतील. तर, त्रिपुराचे काम अरविंदरसिंग लवली आणि अब्दुल खलिक यांच्याकडे असेल.
कॉंग्रेसने नुकतीच हिमाचल प्रदेशची सत्ता काबीज केली. त्या राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकल्याने त्या पक्षाचा उत्साह दुणावला आहे. त्यातून पुढील निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्याची तयारी कॉंग्रेसने चालवली आहे. नव्या वर्षात मिळून तब्बल दहा राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.