मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वास्तविक, सीबीआयने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे देशमुख यांच्या अर्जावर स्थगिती वाढवण्याची मागणी केली होती, जी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय. सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून अनिल देशमुख बाहेर येतील.
सीबीआयच्या या याचिकेला अनिल देशमुखांतर्फे अॅड. अनिकेत निकम यांनी विरोध केला. अनिल देशमुखांना जामीन मिळण्याच्या मुद्द्यावर त्यांनी बाजू मांडली आज अखेर सीबीआयचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळे देशमुखांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणाचा तपास करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) 73 वर्षीय नेत्याला 12 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मागितल्याने हा आदेश 10 दिवसांनंतर प्रभावी होईल, असे न्यायालयाने म्हटले होते.
यानंतर तपास यंत्रणेने देशमुख यांना जामीन देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता, त्याला मंजुरी देत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 डिसेंबर रोजी ठेवली होती. दरम्यान, सीबीआयने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, मात्र कोर्टाला सुट्टी असल्याने जानेवारी 2023 मध्येच सुनावणी होण्याची शक्यता होती.
अशा परिस्थितीत सीबीआयने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कर्णिक यांना देशमुख यांना जामीन देण्याच्या आदेशाला 3 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्याची विनंती केली, जी न्यायालयाने मान्य केली नाही.
दरम्यान, अँटिलिया प्रकरणात बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केले होते. देशमुख यांनी मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांना 100 कोटींच्या खंडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांनंतर देशमुख अडचणीत आले होते. ईडी आणि सीबीआयनं त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात आहेत.