नवी दिल्ली – करोना व्हायरस सध्या थैमान घालत असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर आला आहे. करोना व्हायरसच्या संकटात आशियाई विकास बँकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई विकास बँकेने करोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईत आर्थिक संसाधनांना मदत करण्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनमुळे भारतातील सर्व उद्योग धंदे बंद आहेत. यामुळे देशाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई विकास बँकेने भारताला १.५ अब्ज कर्ज देणार आहे. याविषयी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासात्सुगु असाकावा म्हणाले कि, करोनाविरोधात भारत करत असलेल्या प्रयत्नांत मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशातील गरीब आणि वंचितांपर्यंत प्रामुख्यानं ही मदत पोहोचली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, याआधीही जागतिक बँकेने विकसनशील देशांना करोनाचा प्रसार रोखण्यासाठी १.७ अब्ज डॉलर्सचा विशेष निधी देण्याचं जाहीर केले होते.