पालेकेल्ले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत दोन खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याची शक्यता तसेच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींनी त्रस्त असलेल्या श्रीलंकेचा आज (गुरुवार) बंगलादेशशी सामना होत आहे.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
वेळ – दुपारी 3 वाजल्यापासून
ठीकाण – पालेकेल्ले
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
या स्पर्धेसाठी श्रीलंका संघातील खेळाडूंचे सराव शिबिर सुरू असतानाच अविष्का फर्नांडो व कुशल परेरा यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले व त्यामुळेच श्रीलंका संघाने या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यात उशीर केला.
वनिंदू हसरंगा, लाहिरी कुमारा, दुष्मंत चमिरा व दिलशान मधुशंका यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे श्रीलंका संघात नवोदित खेळाडूंचा भरणा जास्त राहणार आहे. श्रीलंकेचा संघ या स्पर्धेचा गतविजेता असला तरीही यंदा त्यांचा संघ स्पर्धेतील सर्वात कमकुवत संघ असेल असेच चित्र सध्यातरी दिसत आहे.
त्यामुळे त्यांची सर्व मदार पाथुम निसांका, धनुष्का गुणतिलके व चामिका करुणारत्ने यांच्यावरच राहणार आहे. गोलंदाजीतही हसरंगा दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने त्यांना नवोदित गोलंदाजांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
दुसरीकडे बांगलादेशचा संघ जास्त प्रबळ दिसत आहे. संघाचे नेतृत्व अनुभवी शकीब अल हसनकडेच असल्याने तसेच मेहदी हसन, ताजमुल शांतो, महंमद नईम व अफिफ हुसेन गेल्या मोसमापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याने बांगलादेशचेच पारडे जड राहणार आहे. त्यांच्या गोलंदाजीतही सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहेत.खुद्द कर्णधार शकीब अव्वल फिरकी गोलंदाज असून त्याच्या जोडीला मुस्तफिजूर रेहमान, तस्किन अहमद असे चांगले गोलंदाज आहेत.
शकीबवर मोठी जबाबदारी..
बांगलादेशचा कर्णधार व अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब अल हसन याच्यावर या स्पर्धेत मोठी जबाबदारी राहणार आहे. या स्पर्धेसाठी संघ निवड करत असताना शकीबला संधी मिळणार नाही असेच बोलले जात होते. मात्र, लिंटन दासला दुखापत झाल्यामुळे अपेक्षित नसतानाही शकीबला संघात स्थान देण्यात आले व त्याच्याचकडे नेतृत्वही सोपवणत आले. त्यामुळे त्याची कामगिरी कशी होते यावर त्यांच्या संघाचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे.