Israel – Palestine Attack : मध्यपूर्वेतील इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन (Israel – Palestine Attack ) यांच्यातील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली आहे. हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी शनिवारी गाझा पट्टीवर हल्ला करत फक्त २ मिनिटात इस्रायलवर 5000 रॉकेट डागले असल्याची माहिती समोर आली होती. नंतर जमिनीवरून सतत हल्ले करत त्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला. या युद्धात आतापर्यंत तब्बल २,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मात्र हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केला असला तरी गाझा पट्टीपासून ३०० किमी दूर असलेल्या बैरुत शहरात (लेबनानची राजधानी) या हल्ल्याचा कट रचण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे.
इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाविषयी (Israel – Palestine Attack ) महत्वपूर्ण माहिती देताना इस्रायलने दावा केला आहे की, या हल्ल्याचा कट लेबनानच्या बैरूत शहरात रचला होता. तसेच इस्रायलवर हल्ला करण्यासाठी सगळी शस्त्रास्र, दारूगोळा, आणि रॉकेटसह इतर यंत्रसामग्री ही लेबनानने पुरवली होती. शस्त्र मिळाल्यानंतर हमासचे दहशतवादी इस्रायलवर तुटून पडले. असे सांगण्यात आले आहे.
लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या मदतीमुळेच हमास हा हल्ला करू शकली. हिजबुल्लाह एका बाजूला हमासला मदत करत आहे, त्याचबरोबर हमासच्या हल्ल्यापाठोपाठ हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनीदेखील इस्रायलवर हल्ला केला. त्यामुळे इस्रायलचे सैन्य एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढत आहे.
हिजबुल्लाहने मंगळवारी इस्रायली रणगाड्यांवर क्षेपणास्रं डागली. या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने लगेच हा हल्ला आपणच केला असल्याचे जाहीर केले. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हिजबुल्लाहने या हल्ल्याचे उघडपणे समर्थन केले आहे. तसेच लेबनानमध्ये हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला इराणी सरकार ताकद देत आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेत ५०,००० हून अधिक तरुणांचा भरणा आहे.
हिजबुल्लाहने इस्रायलमधील तीन ठिकाणी क्षेपणास्र, मोर्टार आणि बॉम्बहल्ला केला आहे. लेबनानमधून डागण्यात आलेली क्षेपणास्र माउंट दोव्ह प्रांतात कोसळली. तसेच हे हल्ले करून हिजबुल्लाहने एक निवेदन जारी केले. यात हिजबुल्लाहने म्हटले आहे की, आम्ही इस्रायलवर हल्ला केला आहे. इस्रायली लोकांनी पॅलेस्टाईनवर केलेल्या अत्याचारांचा बदला घेण्यासाठी आम्ही पॅलेस्टिनी लोक आणि हमासबरोबर उभे आहोत. दरम्यान, हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायलने लेबनानच्या सीमेवर गोळीबार करून प्रत्युत्तर दिले.