नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण जगभरातील तरुण ज्या संस्थेत जाऊन आपले स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बाळगतात त्या नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. एका भामट्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 111 जणांची नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केली आहे.
ओमकार तलमले असे फसवणूक करणाऱ्याचे नाव असून ओमकारने या 111 जणांकडून तब्बल 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपये लुबाडले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ओमकारने पैशांचे आमिष दाखवून दोन व्यापाऱ्यांची हत्या देखील केली. ओमकारने पैशांचे आमिष दाखवून एका आठवड्यापूर्वी नागपूर शहरातील दोन व्यापारांची काही गुंडांच्या मदतीने अपहरण करून कोंढाली जवळ हत्या केली होती आणि त्यानंतर दोघांचे मृतदेह वर्धा जिल्ह्यातील नदीत फेकून दिले.
याप्रकरणी ओमकारला नागपूर पोलिसांकडून अटक झाल्यानंतर हिंमत बळावलेल्या तरुणांनी समोर येऊन फसवणुकीची नागपूर शहर पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. ओमकारने अनेक तरुणांना खोटं अपॉइंटमेंट लेटरही पाठवले होते. नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे, ओमकार तलमले याने तो 2017 पासून नासामध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. तो आपल्या संपर्काच्या माध्यमातून नासा आणि इस्रो सारख्या संस्थांमध्ये नोकरी लावून देऊ शकतो अशी स्वप्न तरुणांना दाखवत होता. त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये लुबाडत होता.
ओमकारने अनेक तरुणांना नासाच्या खोट्या लेटर पॅडवर अपॉइंटमेंट लेटर ही पाठवले होते. सध्या ओंकार तलमले हत्येच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे. लवकरच नागपूर शहर पोलीस फसवणुकीच्या या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहे आणि त्यानंतर फसवणुकीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे.