जामखेड -भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी देशातील 54 नेत्यांची टीम तयार केली असून, त्यात आ. प्रा. राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आ. प्रा. शिंदे कर्नाटक दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यावर पक्षाने महत्त्वाच्या मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली.
कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायचीच या इराद्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आ. शिंदे यांच्यासमवेत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड या पाच नेत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
दि. 8 व 9 रोजी अयोध्या दौऱ्यात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर आ. प्रा. शिंदे सहकाऱ्यांसह आज कर्नाटक दौऱ्यावर रवाना झाले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दि. 13 रोजी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून, दि. 20 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दि. 24 रोजी अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे. दि. 10 मे रोजी मतदान, तर 13 मे रोजी निकाल आहे.
कर्नाटकमधील बंगलोर जिल्ह्यातील 177 अनेकल विधानसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात मुसंडी मारण्यासाठी भाजपने आ. प्रा. शिंदे यांच्या खांद्यावर प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. हा मतदारसंघ सर करण्यासाठी आ. शिंदे पुढील काही दिवस तळ ठोकून असतील.