पुणे – खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी “पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत,’ असे जाहीर केले आहे. तर ,”जगतापांचे हे वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे,’ अशी टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
जागा कॉंग्रेसच्या वाट्याला
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा वाटपात पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. तर, शहरात दोन आमदार असल्याने राष्ट्रवादीकडून या जागेवर दावा सांगण्यात येत असल्याचे समोर आले आहे. बापट यांच्या निधनानंतर कॉंग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी या जागेवर निवडणुकीबाबत वक्तव्ये केलेली असताना; राष्टृावादीचे नेते अजित पवार यांनी कॉंग्रेस नेत्यांचा समाचार घेतला होता.
प्रशांत जगताप म्हणाले…
“सोमवारी सकाळपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर लोकसभा पोट निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे. शहरात दहा वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. तसेच 2019 मध्ये झालेल्या विधानसभेत पक्षाचे दोन आमदारही आहेत. त्यामुळे ही जागा पक्षाला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. ती वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या सर्व विधी होईपर्यंत याबाबत पक्ष काहीही बोलणार नाही, अशी आमची भूमिका होती. त्यानुसारच आम्ही ही भूमिका मांडत आहोत. ही जागा कॉंग्रेसकडे असली, तरी या जागेबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, पक्षाला ही जागा मिळाल्यास आपण ही निवडणूक लढविण्यास तयार आहोत,’ अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले…
“राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना त्यांच्या नेतृत्वाने या बाजूबाबत जाब विचारावा. पोटनिवडणुकीबाबत अजून काही निर्णय झालेला नाही. माझ्या पक्षाबाबत बोलायचे झाल्यास गिरीश बापट यांचा तेराव्याचा विधी झाला. दि. 16 एप्रिलला श्रद्धांजली सभा होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची चर्चा करणे हे चुकीचे आहे. हे पूर्णपणे असंवेदनशील मनाचे उदाहरण आहे. काही दिवस जातील, तेव्हा हळूहळू चर्चा सुरू होईल,’ अशी भूमिका पालकमंत्री तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे.