नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल हिची एका वेबसाइटवर ऑनलाइन सोफा विक्री करताना फसवणूक झाली आहे. हर्षिता आपल्या घरातील एक सोफा ऑनलाइन पोर्टलवर विकत होती. यावेळी तिला पैसे पाठवण्याच्या नावाखील आरोपींनी 34 हजार रुपयांना गंडा घातला. हर्षिताने याबाबत पोलीस तक्रार दाखल केली आहे.
हर्षिताने एका वेबपोर्टलवर घरातील जुना सोफा विकण्यासाठी पोस्ट केली. यावर आरोपींनी हर्षिताकडे संबंधित सोफा विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. चर्चेनंतर तो सोफा विकत घेण्याचे आरोपींनी निश्चित केले. सोफ्याचे पैसे पाठवण्यासाठी त्यांनी आधी हर्षिताच्या बॅंक खात्यावर काही पैसे पाठवले. हर्षिताने ते पैसे मिळाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तिला एक बार कोड स्कॅन करायला सांगितले. हा बार कोड स्कॅन केल्यानंतर लगेचच हर्षिताच्या बॅंक खात्यावरुन 20 हजार रुपये कमी झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हर्षिताने संबंधितांना याबाबत जाब विचारला. मात्र, आरोपींनी चुकीने वेगळा बार कोड पाठवल्याची सारवासारव केली. तसेच नवा बार कोड स्कॅन करा हे पैसे परत येतील असेही सांगितले. यावर विश्वास ठेऊन हर्षिताने पुन्हा एकदा नवा बार कोड स्कॅन केला. यावेळीही तिच्या बॅंक खात्यावरुन 14 हजार रुपये वजा झाले. त्यानंतर हर्षिताला आपण पूर्णपणे फसवलो गेल्याची जाणीव झाली. यानंतर तिने तात्काळ सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या ऑनलाइन फसवणुकीचा तपास सुरु केला आहे. हर्षता केजरीवाल यांच्या तक्रारीवरुन आम्ही गुन्हा नोंदवला आहे. तसेच याची चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच आम्ही आरोपींना शोधत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.