Arvind Kejriwal – व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून करण्यात आली आहे.
त्यावर राउज ॲव्हेन्यू न्यायालयात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आपले म्हणणे न्यायालयात मांडले. केजरीवाल जामीन मिळवण्यासाठी कोणत्यातरी बाबीचा आधार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. । Arvind Kejriwal
त्यांना हाय ब्लड शुगर असल्याचा दावा ते करतात, मात्र तुरूंगात ते मिठाई आणि आंबे खात आहेत असे ईडीने म्हटले आहे. केजरीवाल यांच्या डाएट चार्टमध्ये मिठाई आणि आंबे आहेत. हे पदार्थ मधुमेह असलेल्यांना वर्ज्य आहेत. त्यांचा डाएट चार्ट न्यायालयासमोर ठेवण्यात आला आहे असे ईडीने सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात केजरीवाल यांची बाजू मांडणारे त्यांचे वकिल विवेक जैन म्हणाले की आम्ही संबंधित अर्ज मागे घेत नवीन अर्ज दाखल करणार आहोत. मात्र ईडीकडून अशी माहिती माध्यमांना दिली जाते आहे. माध्यमांसाठीच ते असे आरोप करत आहेत.
आता उद्या शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी घेणार आहे. तसेच त्यावेळी केजरीवाल यांच्या आरोग्याशी संबंधित अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणात केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.
या घोटाळ्यात केजरीवालांचा थेट सहभाग होता असा ईडीचा आरोप आहे. तब्बल ६०० कोटी रूपयांची लाच घेतली गेली असून त्याचा आम आदमी पार्टीला आपल्या निवडणूक अभियानात फायदा झाल्याचाही ईडीचा दावा आहे.