डाएटिंग करताना…

पूर्वी आणि अजूनही उपवास करण्याचे प्रमाण, खास करून महिलावर्गात फार मोठे आहे. वेगवेगळ्या देवतांचे, उदा. शंकर (सोमवार) ,दत्त (गुरुवार), मारुती-शनी (शनिवार), देवी (मंगळवार/शुक्रवार), संकष्टी, अंगारकी, एकादशी, प्रदोष, अष्टमी असे अनेक उपवास केले जातात. यामागे धार्मिक कारण, भक्तिभाव असायचा. आता मात्र अशा प्रकारचे उपवास हे “डाएट’ असे गोंडस नाव देऊन केले जातात. वजन कमी करणे, शरीरसौष्ठव राखणे अशी यामागची कारणे असतात. झिरो फिगर हा देखील उपासमार करणारा एक नवीन आलेला आहे.

पूर्वी एकादशी दुप्पट खाशी असे म्हणायचे, आता या डाएटबाबतही तसा काहीसा अनुभव येतो. डाएट करायचा निशचय केलेला असतो आणि एखादा मोह घालणारा खाद्यपदार्थ समोर येतो. मग त्या मोहापुढे डाएटचे तीनतेरा वाजतात. कधी आग्रह होतो, कधी मोह होतो. तर कधी एखाद्या मेजवानीचे, पार्टीचे, लग्नसमारंभाचे निमित्त समोर येऊन उभे राहते आणि हे सारे डाएट प्लानिंग आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरत आहे असे दिसून येत असतानाच त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात झालेली असतानाच.

लग्नसमारंभ, पार्टी, सण, उत्सव आले की डाएटला आपोआपचं सुट्टी दिली जाते. वाढदिवस आणि केक, सण आणि मिठाई, पार्टी आणि खाद्यपदार्थांची रेलचेल ही समीकरणं इतकी जुळलेली आहेत की त्यांच्यापासून अलिप्त राहणं काही आपल्याला जमत नाही. मग महिना पंधरा दिवस नित्यनेमानं पाळलेल्या डाएटच्या रीतसर वेळापत्रकाचा उपयोग शून्य होऊन जातो. पुन्हा गोळाबेरीज शून्य होते.

मग आपल्या डाएटची पुन्हा नव्यानं सुरुवात नक्की कशी व केव्हापासून करावी, हा प्रश्‍न पडतो. त्यासाठी काही टिप्स :

– खाण्यापिण्यावर फार अंकुश न ठेवताही, आपला डाएट प्लॅन सांभाळून आणि फिटनेसचे नियम पाळूनही वेगवेगळ्या चवी चाखता येऊ शकतात. त्यांचा आनंद घेता येतो. तुमचं खाण्याच्या प्रमाणावर ताबा मिळवलात, एक लक्ष्मणरेषा आखून घेतली आणि ती ओलांडणार नाही, असा ठाम निश्‍चय केला व तो पाळला तर खवय्येगिरी करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवणार नाही.

– मला बारीक व्हायचंय आणि म्हणून मी डाएट करणार आहे, असं म्हणणारे हौशी लोक डाएटच्या नावाखाली अनेकवेळा उपाशी राहतात. पटकन फरक दिसावा यासाठी उपवासाच्या नावाखाली उपाशी राहण्याचे प्रयोग करणारांची संख्या काही कमी नाही, अशा प्रकारे कदाचित तुमचेही अनेक प्रयोग करूनही झाले असतील. पण अशा उपाशी राहण्याच्या नाटकी पद्धतीनं वजन कमी झालं, तरी शरीरातले फॅट्‌स कमी होत नाहीत. उलट शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे, नेहमीपेक्षा जास्त भूक लागते. त्यामुळे ही दिखाऊ पद्धत तात्पुरती आहे हे वेळीच लक्षात घ्या व कायमस्वरूपी सशक्त बदलासाठी उपयुक्त अशा डाएट प्लॅनची निवड करा.

– डाएट प्लॅनची निवड करताना तो प्रत्यक्ष पाळणं तुम्हाला खरंच जमणार आहे का, याची एकदा स्वतःच्या मनाशी खात्री करून घ्या. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुमच्या प्रकृतीला अनुकूल डाएट प्लॅनची निवड केलीत, तर त्याचं पालन करणंही सोपं जाईल.

– सणासुदीला लाडू, चकली, करंजी, बर्फी यासारखे तुमचे आवडीचे जिन्नस खायला काहीच हरकत नाही. पण खाण्याच्या प्रमाणावर मात्र तुमचा ताबा असयलाच हवा.

– एखाद्या पार्टीत भरपूर पदार्थांची रेलचेल असेल तर काय खाऊ आणि काय नको असं होतं. मग अशावेळी पचायला हलक्‍या असणाऱ्या पदार्थांची निवड करावी.

– आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या वागण्यावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे बुफेपासून अगदी जवळच्या टेबलावर बसलं की आवडलेला पदार्थ परत-परत घेण्याचा मोह होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे बुफेपासून लांब असलेल्या टेबलावर जेवायला बसावं.

– शरीराचं चलनवलन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. बाहेर एखादी चक्कर टाकून येणं, जिने चढणं-उतरणं, घरातल्या घरात फेऱ्या मारणं या साध्या हालचाली रोजच्यारोज करणंही आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायद्याचं ठरतं. दररोज व्यायाम करत असाल तर वन्स इन अ व्हाइल मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही. किंबहुना उपवास करण्याला हा एक हेल्दी आणि उत्तम पर्याय आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)