थंडीचा जोर राज्यभरात वाढला आहे. थंडी म्हटली की कोरडेपणा नकळत आला. त्याचा परिणाम आपली त्वचा, केस यांवर नकळत होतो आणि मग थंडीनी अंगाला खाज येणे, ओठ फुटणे, केसात कोंडा होणे अशा समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. थंडीतील याच समस्यांवर वेळीच तोडगा काढायचा असेल तर घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. चाल तर मग पाहूयात थंडीत त्वचेची काळजी घेण्यासाठीच्या काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स…
थंडीमध्ये त्वचा जास्त कोरडी पडत असेल तर आंघोळीच्या वेळी किंवा तोंड धुतानाही साबण, फेस वॉश यांचा कमीतकमी वापर करा. चेहऱ्याला आणि अंगाला मसूर डाळीचे पीठ लावा. त्यात थोडी साय आणि दूध मिसळल्यास त्वचेतील स्निग्धता टिकून राहण्यास मदत होईल. थंडीत स्क्रबरने त्वचा घासणेही टाळावे.
आंघोळीनंतर ओलसर त्वचेवरच चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर, चक्क शेंगदाणा तेल लावावे. बाजारात नेहमी मिळणारी मॉइश्चरायझर आपल्या त्वचेस चालतील की नाही अशी शंका असल्यास त्वचारोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
शरीराच्या अनेक समस्यांसाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
केमिकल असलेल्या उत्पादनांचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक उत्पादनांचा वापर करणे केव्हाही चांगले. यामध्ये बटर, लोणी, तेल, कोरफड आणि ऑलिव्ह ऑईल ही उत्पादने उपयुक्त ठरतात. तसेच साबणाऐवजी उटणे किंवा हळद, दूध आणि डाळीचे पीठ लावावे.
त्वचा आणि शरीरातील स्निग्धता टिकविण्यासाठी जास्तीत जास्त चांगला आहार घेणेही महत्त्वाचे असते. स्निग्ध पदार्थ, फळे, दूध यांचा आहारात समावेश ठेवल्यास त्वचा आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यास निश्चतच मदत होते.