नंदुरबार – ग्रामपंचायतीने किंवा गावातील दानशूर व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास खापर आरोग्यवर्धिनी केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री ऍड. के. सी. पाडवी यांनी केले.
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नूतन मुख्य इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाडवी म्हणाले, प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गुजरातलगत असल्याने गुजरात राज्यातील सीमावर्ती तसेच गावालगत मुख्य रस्त्यामुळे होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता या भागातील नागरिकांना या ठिकाणी चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम केल्याने या भागातील लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या केंद्रातील साहित्य खरेदीसाठी जिल्हा वार्षिंक योजनेंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या भागात करोनाचा प्रादुर्भाव जरी कमी असला तरी नागरिकांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.