कोल्हापूर /प्रतिनिधी – लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करा या मागणीसाठी कोल्हापुरातील वीज बिल भरणार नाही कृती समिती आक्रमक झाली आहे. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कारवाई न केल्याबद्दल आज वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीने मिरजकर तिकटी येथे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी भरणार नाही भरणार नाही वीज बिल भरणार नाही अशा घोषणांनी मिरजकर तिकटी चा परिसर दणाणून गेला आहे. दरम्यान लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ व्हावा या मागणीसाठी गेले चार महिने वीज बिल भरणार नाही कृती समितीच्यावतीने रस्त्यावरची लढाई सुरू आहे. याबाबत शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला निवेदने देखील दिली आहेत.
मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या कोल्हापूरकरांनी आज ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत लॉक डाउन काळातील वीज बिल माफ होणार नाही तोपर्यंत उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे