विशेष प्रशिक्षण आणि सर्वेक्षण; छावणी परिसरात उपाययोजना
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर छावणी परिसरातही विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. परिसरातील नागरिकांच्या योग्य तपासणीसाठी लष्करी वैद्यकीय सेवेच्या तज्ज्ञांकडून कॅन्टोन्मेट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, सोमवारपासून रूग्णालयात स्वतंत्र ओपीडी सुरू केली जाणार असल्याची माहिती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी लष्कराच्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरियाचे प्रमुख मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल बी. पठानिया, लेफ्टनंट कर्नल प्रेरणा शंकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राम यांनी लष्करी शिस्तीची प्रशंसा करत, छावणी परिसरातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच कोरोनाचा संसर्ग इतर आजारांपेक्षा अधिक वेगाने होत असल्याने खबरदारी घेणे गरजेचे असून, परिसरातील विद्यार्थी, नागरिक यांना संसर्गापासून बचावासाठी दक्षतेबाबत सांगितले जावे, अशी सूचना केली. यानंतर मेजर जनरल कुमार यांनी बोर्डाचे पदाधिकारी, लष्करी अधिकारी आणि लष्करी वैद्यकीय सेवेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली.
छावणी परिसरातील उपाययोजनांबाबत बोलताना अमितकुमार म्हणाले की, बोर्डातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. लग्नकार्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, त्या परवानग्या एक महिन्यासाठी रद्द केल्या जाणार आहेत. तसेच कोरोनाबाबत जनजागृतीसाठी पत्रके वाटली जाणार आहेत. तसेच एलईडीच्या माध्यमातूनही जनजागृतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
छावणी परिसराची पाहणी…
छावणी परिसरात विविध कामानिमित्त परदेशी अथवा बाहेरगावी जाणाऱ्या लष्करी अधिकारी आणि नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. ही बाब लक्षात घेत, लष्कर प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून परिसरातील बंगलो एरियामध्ये विशेष सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे. यासाठी लष्करी अधिकाऱ्यांची एक तुकडी आणि बोर्डाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी यांचा एक गट तयार करण्यात आला असून, परिसराचे सखोल सर्वेक्षण यांच्याद्वारे केले जाणार आहे. करोनाचे लक्षण असलेली व्यक्ती उपचारापासून वंचित राहून नये आणि विषाणूचा प्रसार रोखला जावा, हे उद्देश असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी सांगितले.