सिडनी – ऑस्ट्रेलियामध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे लॉकडाऊनला मुदतवाढ दिली गेली आहे. क्वीन्सलॅन्ड प्रांताने ब्रिस्बेन शहरातील लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली आहे. नागरिकांनी आपापल्या घरातच रहावे यासाठी चक्क लष्करी दलांना रस्त्यांवर गस्तीसाठी पाचारण करावे लागले आहे. सिडनी आणि ब्रिस्बेन या शहरांमध्ये लष्कराने गस्त घालून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले.
क्वीन्सलॅन्डमध्ये एकाच दिवसात करोनाचे 13 नवीन रुग्ण सापडले आहेत. या वर्षभरात क्वीन्सलॅन्ड प्रांतात एकाच दिवसात सापडलेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.
ब्रिस्बेन शहरातील लॉकडाऊन आज संपणार होता. मात्र डेल्टा व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे आता या लॉकडाऊनची मुदत रविवारपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये अद्याप डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र करोना विषाणूमुळे 34 हजार जणांना संसर्ग झाला आहे आणि 925 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.