पुणे – शहरातील शाहिर अमर शेख चौकाजवळ पदपथावर मृत अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पदपथावर मृतावस्थेत आढळलेली व्यक्ती ही फिरस्ती असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. त्याचा मृतदेह 27 जुलैला आढळून आल्यानंतर शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला होता.
शवविच्छेदन अहवालात त्या व्यक्तींचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेविषयी अधिक माहिती घेतली असता दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या डोक्यात काठीने व शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली होती.
संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी पळ काढला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज अभंग करीत आहेत.