अर्जुन खोतकरांचा पाय खोलात?; मध्यरात्री दोन वाजेपर्यंत खोतकरांच्या निवासस्थानी ईडीचे धाडसत्र

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यावर आणि नेत्यांवर ईडीचे धाडसत्र सुरु आहे. त्यातच शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचाही नंबर लागला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खोतकरांवर कोट्यवधींच्या घोटाळ्यानंतर आणि त्यावर खोतकरांनी दिलेल्या स्पष्टीकरनंतरही ईडीकडून त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला असल्याचे समोर आले आहे.

ईडीने अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबधित जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला.  ईडीचे  पथक शुक्रवारी सकाळीच अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातल्या निवासस्थानी पोहोचले. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेला छापा थेट मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरूच होता. यादरम्यान, ईडीने सखोल तपास केला असून आज देखील ही चौकशी सुरू असणार असल्याचे  सांगण्यात येत आहे. दरम्यान, छापा पडला, तेव्हा अर्जुन खोतकर घरीच असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित दोन उद्योजकांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर किरीट सोमय्यांनी अर्जुन खोतकर यांना लक्ष्य केलं होतं. हा कारखाना अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय जुगलकिशोर तापडिया यांना कागदोपत्री विक्री करण्यात आला. पण त्यासाठी देण्यात आलेली रक्कम अर्जुन शुगर्समधून देण्यात आली होती.

जुगलकिशोर तापडिया यांनी त्यांच्या व्यवहारविषयक कागदपत्रात तसे मान्य केले आहे. १९८४ मध्ये जालना कारखाना उभारण्यात आला होता. दहा हजार सभासद असणाऱ्या या कारखान्याची मोठी जमीन असल्याने त्याच्या विक्रीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला जात होता. लातूर येथील माणिकराव जाधव यांनी या प्रकरणात पहिली तक्रार केली होती.

अण्णा हजारे, मेधा पाटककर यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. पण अलिकडेच हे प्रकरण भाजपने उचलले आहे. या अनुषंगाने तापडिया आणि त्यानंतर पद्माकर मुळे यांनी हा कारखाना खरेदी केला. त्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी आता अंमलबजावणी संचालनालयाकडून केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.