पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकामध्ये सुरू झाले आहे. आता या चौकातील वाहतूक कोंडी दूर व्हावी, यासाठी महापालिकेने उपाययोजना करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. यामध्ये चौकातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी संबंधित संस्थांशी समन्वय साधावा आणि रस्ते खुले करावेत, आदी प्रमुख सूचना आहेत.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपुल पाडण्यात आला आहे. एकाच चौकात पाच रस्ते एकत्र येत असल्याने याठिकाणी सतत वाहतूक कोंडी होते. आता येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो धावणार आहे. तर पहिल्या मजल्यावरून अन्य वाहने धावतील. आता प्रत्यक्ष मेट्रोचे काम सुरू झाल्याने रस्त्याची रुंदी कमी होणार असून, येथे आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणामार्फत (पुम्टा) वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यास ऑक्टोबरमध्येच मान्यता मिळाली आहे.
अशा आहेत प्रमुख सूचना
* पुणे विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक
* हा साधारणत: 250 मी लांबरस्त्याचे डाव्या बाजूचे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार
*रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात यावे.
* अस्तित्वातील सेवावाहिन्यांचे स्थलांतर करणे.
* पर्यायी रस्ते खुले करणे. अतिक्रमणे काढणे.
* सेनापती बापट चौकातील मेरियट हॉटेलसमोरील दुभाजक काढण्यासाठी परवानगी देणे.
* आवश्यक तेथे नो पार्किंग झोन करावा. रस्ता रुंदीकरणास व वाहतूक अडथळा निर्माण *करणारे विद्युत खांब, सीसीटीव्ही खांब, दिशादर्शक फलक हटवावेत.