पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना बससेवा पुरवणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गुरुवारी प्रशासनाच्या वतीने कौतूक करण्यात आले.
लॉकडाऊन कालावधीत पीएमपी प्रशासनाकडून प्रवासी सेवा स्थगीत केली असली तरी, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आदींना विशेष सेवा पुरवण्यात येत होती. यासह पोलिसांच्या सूचनेनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरांतील मजूरांना स्थानकापर्यंत सोडण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांना बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या परिस्थितीमध्ये पीएमपीचे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करत होते. स्वारगेट आणि पिंपरी डेपोतील चालक, स्वीपर, अभियंते, पर्यवेक्षक आदींसह अधिकारी वर्गाच्या कामाचे कौतूक करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव केला.
दरम्यान, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, वाहतूक व्यवस्थापक, मुख्य अभियंता यांसह महामंडळाचे अधिकारी आणि आगार व्यवस्थापक उपस्थित होते.