पारनेर – पारनेर तालुका पिंपरी जलसेन येथील करोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा संपर्कात आलेल्या निघोज, पिंपरी जलसेन, पठारवाडी व चिंचोली या गावांतील 33 जणांना तपासणीसाठी नगर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यापैकी नऊ जणांचे स्त्राव करोना चाचणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्या नऊ जणांना नगर येथेच ठेवण्यात आले.
मुंबई येथून हा करोनाबाधित रुग्ण पिंपरी जलसेन येथे आला होता. मात्र त्यास खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र फरक न पडल्याने त्याने निघोज येथील प्राथिमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांना तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.
आरोग्य विभागामार्फत निघोज, पिंपरी जलसेन, पठारवाडी या गावांमध्ये ग्रामस्थांची तपासणी करण्यात येत आहे. कोणी संशयित आढळला, तर त्याला ताब्यात घेऊन करोना चाचणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले. पिंपरी जलसेन, पठारवाडी, निघोज, चिंचोली या चारही गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, दोन दिवसांसाठी चारही गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. निघोज येथील ज्या खासगी रुग्णालयात या करोनाबाधिताने उपचार घेतले होते, ते रुग्णालयही 24 तासांसाठी सील करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.