पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील विषयाला राज्य शासनाच्या वित्त विभागाने डिसेंबर महिन्यातच मान्यता दिलेली आहे. हा वेतन आयोग लागू करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत काटे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचारी प्राणपणाने लढत आहेत. त्यांना प्रोत्साहन भत्ता, विमा, वैद्यकीय साहित्य पुरविण्यासंदर्भात आम्ही यापूर्वीच मागणी केली आहे. सातवा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून हा वेतन आयोग लागू केल्यास कर्मचाऱ्यांचे मनोधर्य वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करून त्यांना न्याय द्यावा, असेही या निवेदाना काटे यांनी म्हटले आहे.
खरेदीची माहिती मागविली
महापालिकेकडून करोनाच्या प्रतिबंधासाठी केल्या जात असलेल्या खरेदीची व विनियोगाची माहिती विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मागविली आहे. थेट पद्धतीने केलेली कोणाकडून किती खरेदी केली, सीएसआरमधून कोणते साहित्य मिळाले? खरेदीनंतर या साहित्याचा कोठे-कोठे विनियोग करण्यात आला याची माहिती काटे यांनी मागितली आहे.