पुणे (प्रतिनिधी) – ईडी कडून जप्त करण्यात आलेल्या डी. एस. के. यांच्या घरात दोन कुत्री आणि सहा मांजरे अडकून पडली आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी कोणी नसल्यामुळे त्यांना रेस्क्यू या संस्थेकडे सुपूर्त करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज शिरीष कुलकर्णी यांनी अॅड. आशिष पाटणकर आणि अॅड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत न्यायालयात दाखल केला आहे.
गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. के. याच्या कुटुंबावर करावी करण्यात आली. फसवणूक प्रकरणी डीएसके यांच्या कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या डीएसके, पत्नी हेमंती, मुलगा शिरीष येरवडा कारागृहात आहेत.
ईडीने डीएसके यांच्या मालमत्ता जप्त केले आहे. त्यामुळे डीएसके यांच्या घरातील दोन कुत्रे, सहा मांजरे ही देखभाली विना आहेत. त्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेला सुरक्षा रक्षक लॉकडाऊन मुळे येऊ शकत नाही. त्यामुळे या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचा जीव जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शिरीष कुलकर्णी यांनी अॅड. आशिष पाटणकर आणि अॅड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल करून ते प्राणी रेस्क्यू या संस्थेकडे सुपूर्त करण्याची मागणी केली. रेस्क्यू या संस्थेने या प्राण्यांना सांभाळण्याची तयारी दर्शवली असल्याने हे प्राणी संस्थेकडे देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.यावर उद्या (मंगळवारी दि.5) सुनावणी होणार आहे.