पुणे – चिली आणि वॉशिंग्टन येथून सफरचंदाची मार्केट यार्डात आवक वाढत आहे. दिसायला आकर्षक, रंगाने लाल आणि चवीने गोड असल्याने ग्राहकांकडून त्यास मागणी आहे. किरकोळ बाजारात 1 किलोला दर्जानुसार 160 ते 200 रुपये दर मिळत आहे.
यंदा दररोज 30 ते 35 टन इतकी आवक होत आहे. रेड डेलिशेस आणि रॉयल गाला या दोन जातीचे सफरचंद दाखल होत आहे. रेड डेलिशेस जातीचे सफरचंद चवीला गोड असते. तर, रॉयल गाला आंबट गोड असते. घाऊक बाजारात चिली येथील सफरचंदाला 20 किलो बॉक्सला 2500 ते 3000 तर, वॉशिंग्टन सफरचंदाला 20 किलोस 3000 ते 3500 रुपये भाव मिळत आहे.
वाहतूक खर्च जास्त असल्याने वॉशिंग्टन सफरचंदाचे भाव जास्त आहेत. जुलैच्या अखेरीस हिमाचल प्रदेश येथील सफरचंदाचा हंगाम सुरू होईल, अशी माहिती परदेशी फळांचे व्यापारी सलीम बागवान यांनी दिली.