मुंबई: सर्वधर्मीय प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही. तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल, असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे. या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे, असे सांगितले. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते, त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले. यावेळी लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर नेमके कशा प्रकारे नेमके राज्य सरकारांनी कशी परिस्थिती ठेवावी याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितले.
परराज्यातील श्रमिक, कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेता असून 3 हजार निवारा केंद्रांतून 3 लाख 25हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेसचे भोजन देत असल्याची माहिती यावेळी दिली. त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही यातील तज्ज्ञ, डॉक्टर नियुक्त केले आहेत, असेही सांगितले. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना देखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.