नवी दिल्ली: दिल्लीतील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमानंतर देशातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. या धार्मिक समारंभाच्या आयोजनातील प्रमुख असलेल्या मौलाना साद कांधलवी याचा शोध सुरू आहे. मौलाना साद 28 मार्चपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 14 रुग्णालयांमध्ये पोलिसांनी शोध घेतला आहे.
याच दरम्यान मौलाना सादचे दोन ऑडिओ मेसेज व्हायरल झाले आहेत. त्यातील पहिल्या मेसेजमध्ये मौलाना सादने आपण “सेल्फ-क्वारंटाइन’ झालो असल्याचे म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार आपण दिल्लीतच “आयसोलेशन’मध्ये असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर मरण्यासाठी मशिदीसारखी जागा नाही आणि आपल्या अनुयायांना करोना विषाणूपासून काहीही धोका नसल्याचे त्याने म्हटले आहे.
तर दुसऱ्या ऑडिओ मेसेजमध्ये त्याने तबलिगी सदस्यांना सरकारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. निःसंशयपणे, जगात जे घडत आहे ते मानवतेच्या गुन्ह्यांचा परिणाम आहे. आपण घरीच राहिले पाहिजे, हाच देवाचा क्रोध शांत करण्याचा एकमेव मार्ग आहे. स्वतःचे विलगीकरण करावे. तसे करणे इस्लामच्याविरोधात नाही, असेही त्याने म्हटले आहे.
नियमांचे उल्लंघन करून तसेच प्रतिबंधात्मक आदेश असतानाही मरकझ निझामुद्दीन या धार्मिक समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी तबलिगी जमातच्या कार्यकर्त्यांना आवाहन केल्याचा आरोप मौलाना सादवर ठेवण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर निझामुद्दीन येथील इमारत रिकामी करायला गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना दुरुत्तर देण्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
दिल्लीतील निझामुद्दीन भागामध्ये तबलिगी जमातच्या “मरकझ’ या तब्बल 100 वर्षांपूर्वीच्या धार्मिक समारंभामध्ये सहभागी झालेल्यांपैकी 400 जणांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. दक्षिण दिल्लीतील तबलिगी जमातचे तब्बल 9 हजार कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन गेले असल्याची माहितीही पुढे आली आहे. यामध्ये देशांतर्गत तसेच विदेशातील कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.