बेंगळुरू – आम्ही राहुल गांधी यांना कॉंग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यास भाग पाडू. कारण, त्यांच्याशिवाय पक्षात अखंड भारताचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेचा दुसरा नेता नाही. पक्ष व देश हितासाठी त्यांनीच पक्षाध्यक्षपद स्वीकारणे अगत्याचे आहे हे आम्ही त्यांना ठसवून सांगू, असे ज्येष्ठ नेते एम. मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
खर्गे म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या नेत्याला देशभरात ओळखले जावे, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि पश्चिम बंगालपासून गुजरातपर्यंत त्याला पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा आहे. ही क्षमता राहुल गांधी यांच्याखेरीज अन्य कोणाकडेही नाही.
सोनिया गांधीही आधी पक्षाचे नेतृत्व करण्यास राजी नव्हत्या; पण त्यांना पक्षात सामील होऊन नेतृत्व करण्यास अन्य नेत्यांनी भाग पाडले होते याची आठवणही खर्गे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत करून दिली आहे. आज पक्षात राहुल गांधी यांना दुसरा कोणता पर्याय आहे असा उलट सवालही खर्गे यांनी केला.
अनेक नेते जाहीरपणे राहुल गांधींना पुन्हा पक्षप्रमुख होण्याचा आग्रह करत आहेत. तथापि, या मुद्द्यावर अनिश्चितता आणि सस्पेंस कायम आहे. पक्षातील अनेक सूत्रांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी अध्यक्ष होणार नाहीत या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. 2019 च्या संसदीय निवडणुकीत पक्षाचा सलग दुसरा पराभव झाल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या तारखा ठरवण्यासाठी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या रविवारी होणार आहे. सोनिया गांधी या वैद्यकीय उपचारासाठी विदेशात गेल्या आहेत. तेथूनच त्या व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत. (Apart from Rahul Gandhi, there is no other leader in the party capable of leading a united India – Mallikarjun Kharge)