मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक शहरांमध्ये सेरो सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेत कोरोनाबाबतीत अनेक बाबी समोर आल्या. त्यात हर्ड इम्यूनीटीचे प्रमाण वाढत असल्याचंही निदर्शनास आलं. मात्र याच सर्व्हेच्या दुसऱ्या अहवालात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
चाळी व झोपडपट्टीमधील नागरिकांमध्ये सरासरी ४५ टक्के व इमारतींमध्ये सुमारे १८ टक्के अँटीबॉडीज तयार झाले असल्याचे दुसऱ्या सेरो सर्वेक्षणातून उजेडात आले आहे. आर उत्तर – दहिसर, एम पश्चिम – चेंबूर आणि एफ उत्तर – सायन वडाळा या तीन विभागांमधील झोपडपट्टी आणि इमारतींमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. पहिल्या फेरीत तीनही विभागांतील सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते. मात्र दुस-या फेरीत हे प्राबल्य ४० पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांदरम्यान हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर काम करणाऱया व्यक्तिंमध्ये सरासरी २७ टक्के ऍन्टीबॉडीज आढळून आले. झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये आढळून आलेले ऍन्टी बॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांच्या संख्येचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे.