1998 च्या अणू चाचण्यांमुळे बलुचिस्तानचे नुकसान
बुसान, गोटिंगन – पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये घेतलेल्या अणु चाचणीला 23 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पाक सरकारचा निषेध करण्यासाठी बलुच मॅशनल मुव्हमेंटच्या नेत्यांनी दक्षिण कोरिया आणि जर्मनीमध्ये पाकिस्तानविरोधी निदर्शने केली.
पाकिस्तानने घेतलेल्या या अणू चाचणीमुळे स्थानिक नागरिकांवर झालेल्या विपरीत परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी ही निदर्शने केली गेली होती. बलुच नॅशनल मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी बुसान आणि गोटिंगन शहरांमध्ये या अणु चाचणीच्या दुष्परिणामांची माहिती देणारी पत्रके वाटली आणि पाक विरोधी घोषणाबाजीही केली.
पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये 1998 साली अणू चाचणी घेतली होती. बलुचिस्तानमधील छांगी भागातल्या पर्वतरांगांमध्ये 28 आणि 30 मे रोजी या चाचण्या घेतल्या गेल्या होत्या. या चाचण्यांसाठी पाकिस्तान सरकारने कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे बलुचिस्तानमधील नैसर्गिक परिसंस्थेचे मोठे नुकसान झाले.
दशकभरापर्यंत येथील भूमीवर किरोणोत्सर्जनाचा परिणाम शिल्लक राहिला. दशकानंतरही तेथील लोकांना घातक आजार होत आहेत. नवजात बालकांमध्ये अनुवंशिक दोष आढळून येत आहेत. सर्व जमिन नापीक झाली आहे, असे बलुच नेत्या हाफसा बलुच यांनी बुसानमध्ये सांगितले.