कोरेगाव -कोरेगाव शहरातील विविध विकासकामे आणि नगरपंचायतीला घनकचरा विघटन यंत्र खरेदीसाठी आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जवळपास सर्व प्रभागांमधील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण आणि बंदिस्त गटारे बांधली जाणार आहेत. तीळगंगा नदी सुशोभिकरणासाठीही निधीची तरतूद झाली आहे.
प्रभाग 9 चे माजी नगरसेवक सचिन बर्गे, ज्येष्ठ नेते विलासराव बर्गे, युवा नेते अजित बर्गे यांनी कार्यकर्त्यांसह आमदार महेश शिंदे गटात नुकताच प्रवेश केला. त्यावेळी प्रभागाचा कायापालट करण्याचा शब्द आमदार शिंदे यांनी दिला होता. त्यांनी सचिन बर्गे यांच्यासमवेत प्रभागाची पाहणी केली होती. त्यानंतर चार दिवसांतच या प्रभागात तीन कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सूचनेनुसार नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोरेगाव नगरपंचायतीला दहा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यासंदर्भातील आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी काल (दि. 11) काढले.
वेताळ गल्लीतील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, बंदिस्त गटारे, पेव्हर्स बसवणे आणि सुशोभिकरणासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तीळगंगा नदी परिसरात संरक्षक भिंत, सुशोभिकरण आणि बागकामासाठी एक कोटी 70 लाख आणि नगरपंचायतीला घनकचरा विघटन यंत्र खरेदीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रभाग 6 व 17 मधील कॉंक्रीट रस्ते, बंदिस्त गटारांसाठी प्रत्येकी 70 लाख, प्रभाग 10 मध्ये कॉंक्रीट रस्ते, बंदिस्त गटारांसाठी 50 लाख, प्रभाग 7, 8, 12, 15 मध्ये कॉंक्रीट रस्ते, बंदिस्त गटारांसाठी प्रत्येकी 40 लाख, प्रभाग 13 मध्ये कॉंक्रीट रस्ते, बंदिस्त गटारांसाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तीळगंगा नदी परिसराचा विकास
तीळगंगा नदी सुशोभिकरणावर आमदार महेश शिंदे यांनी विशेष भर दिला आहे. परदेशातील नदी परिसराच्या धर्तीवर विकास आराखडा करून घेतला आहे. सुशोभिकरणासाठी नदीपात्राच्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने खोदकाम सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी 29 कोटी रुपये मंजूर झाले असून, आता आणखी एक कोटी 70 लाख रुपये मंजूर झाले आहे. या निधीतून परिसर हायटेक होणार आहे.