‘रँचो’ची आणखी एक कामगिरी;भारतीय जवानांसाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी बनवले खास तंबू

लडाख: लडाखच्या भूमीवर जवळपास 12 हजार फुटाच्या उंचीवर आपले जवान रात्रंदिन देशाची सेवा करत असतात, पहारा देत असतात. या ठिकाणी रक्त गोठणारी थंडी असते. दरम्यान, या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी सोनम वांगचुक यांनी एक अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी अशा तंबूचा शोध लावला आहे की, त्यात-14 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षाही कमी तापमानाला देखील जवानांना काहीच थंडी वाजणार नाही.

सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित थ्री इडियट्स हा चित्रपट आपण पाहिलाच असेल. त्यात ज्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मोठ्या मोठ्या संमस्यांवर उपाय शोधला जातोय त्याच पद्धतीने खऱ्या आयुष्यातही सोनम वांगचुक हे सोप्या पद्धतीने नव-नवीन उपाय शोधतात. आता त्यांनी लडाखच्या जवानांसाठी एक असा टेन्ट म्हणजे तंबू शोधलाय की ज्यामध्ये शून्य डिग्री सेल्सियसपेक्षाही कमी तापमानात आरामात राहता येऊ शकते.

सोनम वांगचुक यांनी जवानांसाठी सोलर हिटेड मिलेटरी टेन्ट तयार केला आहे. या टेन्टमध्ये उणे तापमानातही निवांत राहू शकता येते. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन सांगितलंय की उणे 14 डिग्री सेल्सियमध्येही या टेन्टमध्ये आरामात राहता येतं. तसेच भारतीय जवानांसाठी या टेन्टचा वापर केला तर उर्जेसाठी करण्यात येणाऱ्या केरोसीनचा वापर करता येतो आणि त्यामुळे प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित येईल.

या टेन्टचे वहन करायचे असेल तरीही सोपं आहे. या सर्व साहित्याचे एकूण वजन 30 किलोपेक्षा कमी आहे. या एका टेन्टमध्ये किमान दहा जवान राहू शकतात. हे टेन्ट कोणत्याही कार्बनचे उत्सर्जन करणार नसल्याची माहिती सोनम वांगचुक यांनी दिली आहे. स्‍टूडंट्स एज्युकेशनल अॅन्ड कल्‍चरल मू्व्हमेंट्स ऑफ लद्दाख या संस्थेच्या माध्यमातून सोनम वांगचुक शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनम वांगचुक यांनी लडाखमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून आईस स्तूपचा शोध लावला. त्यांच्या या शोधाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.