रुचकर सुखाची स्वादिष्ट रेसिपी


“देवबाप्पा सर्वांना सुखी ठेव..!’ मंदिराच्या गाभाऱ्यात देवापुढे नतमस्तक होताना माझ्या चिमुरडीच्या तोंडून उद्‌गार पडले. क्षणभरम मीसुद्धा थोडा भांबावून गेलो. चार साडेचार वर्षांची निरागस मुलगी देवाकडे मागणे मागताना काय मागते तर सर्वांना सुखी ठेव. बालपणीचे दिवस आठवले. देवाकडून जास्त अपेक्षा न करता फक्‍त सुखी ठेवण्याचे मागणे मागितले जायचे. आज आठवणी जाग्या झाल्या. ज्या सुखाबाबत आपण सदैव आग्रही असतो त्या सुखाची व्याख्या काय? त्याची व्याप्ती काय? अशा एक ना अनेक गोष्टी मनात येऊन गेल्या. म्हणायला केवळ दोन अक्षरे परंतु त्याची व्याप्ती तशी पाहता अमर्यादित. समर्थांनी देखील या सुखाच्या बाबत आपल्या श्‍लोकांतून एकप्रकारे प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. ते म्हणतात,

जगी सर्वसुखी असा कोण आहे?
विचारे मना तूच शोधोनी पाहे

जगात सर्व सुखांनी परिपूर्ण माणूस शोधणे तसे कठीणच. “व्यक्‍ती तितक्‍या प्रवृत्ती’ या उक्‍तीप्रमाणे व्यक्‍तिपरत्वे सुखाची व्याख्या वेगळी आहे. कोणाला इतरांच्या आनंदाने सुख मिळते तर कुणाला इतरांना त्रास देऊन. कुणाला भर पावसात ओलेचिंब होऊन तर कुणाला पावसात घरी बसून गरमागरम भाजी खाऊन. कुणाला पैसे कमावून सुख मिळते तर कुणाला कमविलेल्या पैशातून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद आणून.

अनेकदा सुख छोट्या गोष्टीत असते तर कधी मोठ्या सुखाचा पाठलाग करण्यात आयुष्य सरते. सुख ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. व्यक्‍ती,स्वभाव, वातावरण, अपेक्षा आणि परिस्थिती सुखाची व्याप्ती वाढवीत असते. आपण सर्वजण चातकाप्रमाणे सुखाच्या क्षणांची वाट पाहत असतो. मग ते सुख कोणतेही असो, आत्मिक, भौतिक, आध्यात्मिक,मानसिक, शारीरिक, क्षणिक वगैरे वगैरे. सुखाची व्याख्या आणि व्याप्ती भिन्न असली तरी त्यातून मिळणारा आनंद हा मौलिक आहे.

सुखाच्या मागे धावणारे आपण अनेकदा अपेक्षित सुख मिळविण्यात अयशस्वीही ठरतो. अशावेळी आपल्या स्वभावातील, व्यक्‍तिमत्त्वातील व आचारविचारातील पैलू त्यास कारणीभूत ठरत असतात. परंतु आपण ठरविल्यास त्यात नक्‍कीच बदल घडवून सुखाचे क्षण वेचू शकतो. त्यासाठी गरज आहे ती आपल्या जीवनातील रुचकर सुखाची स्वादिष्ट रेसिपी समजून घ्यायची. जीवनात सुखाच्या अनेक रेसिपी आपल्याला अनुभवता येतील. त्यातील यशाचे सुख देणारी एक रेसिपी समजून घेऊया.

यशाची चवदार रेसिपी

प्रथमतः मेंदुरूपी भांडे रिकामे अन्‌ स्वच्छ करून घ्यावे. त्यात कोणताही पूर्वग्रहदूषितपणाचा अथवा दुखाचा कणही राहायला नको. त्यानंतर सकारात्मकतेच्या ऊबदार कापडातील मोड आलेले सद्विचार एका भांड्यात घ्यावेत. त्याचवेळी दुसरीकडे नवनिर्मितीच्या चुलीवर सौम्य ऊर्जेवर ते रिकामे भांडे ठेवावे. त्या चुलीत जळणासाठी राग, मोह, मत्सर आणि अहंकार टाकून द्यावा. त्यात लवचिकतेचे तेल ओतावे. त्यानंतर त्यात इच्छाशक्‍तीचा गरम मसाला (मसाल्याचे पदार्थ) टाकून आशेची फोडणी द्यावी. स्वार्थ, गैरसमज, ताणतणावाला त्यात चवीपुरतं कष्टाचं मीठ आणि आपुलकीचं पाणी टाकून ते शिजायला ठेवावं. शिजल्यानंतर आता शब्दांची साखरपेरणी करून इतरांनाही आपल्या यशाचा गोडवा द्यावा. त्यात “मी’पणाचा डायबेटीज होईल इतकी साखर नक्‍कीच नको. आपल्याला यातून ध्येयप्राप्तीच्या तृप्तीचा ढेकर नक्‍कीच यायला हवा. यासाठी इतरांकडून होणाऱ्या कौतुकाने हुरळून न जाता पुढच्या रेसिपीचे नियोजन तयार असायला हवे.

आयुष्यातील ही यशदायी रेसिपी आपल्या जीवनातील बेचवपणा संपवून आयुष्य अधिक रुचकर बनवेल यात शंका नाही. सुख या शब्दाचा संबंध सगळ्यांनाच येतो. मात्र आपण त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो यावर त्याचा अर्थ ठरतो. सुखाचे पण तसेच आहे. सुख म्हणायला नको तर मानायला शिकले पाहिजे. सुख मानायचे ठरवले, तर पहाट झाली अन्‌ नवा दिवस नवी संधी घेऊन आला हे सुखकारक असू शकते. दु:खच करत बसलो तर, अरे देवा, उजाडला दुसरा दिवस. दिवस कसे सरतात हेच कळत नाही, असे म्हणून यातनाही वाट्याला येतील. सुख हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. त्यामुळे मानसिकता बदलली तर सुखाची व्याख्याही बदलेल. चला तर मग या अनमोल आयुष्यातील प्रत्येक क्षणाला सुखाची रेसिपी देऊन तो सण करूया. जीवनातील आनंद वाढविण्यासाठी सुखाच्या रेसीपीचे रसग्रहण करायलाच हवे.

सागर ननावरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.