‘प्रवास’


“प्रवास’ असा नुसता शब्द जरी उच्चारला तरी सगळ्यांची मनं मोहरून जातात. प्रवास करायला सगळ्यांनाच आवडतो. ऐतिहासिक काळात घोड्यावरून, मेण्यातून, खेचरावरून प्रवास केला जायचा. नाहीतर चक्‍क चालत. नंतरच्या काळात हे साधन बैलगाडी झालं आणि पुढच्या काळात नवीन तंत्र आणि नवीन वाहनं, स्वयंचलित आणि अधिकाधिक सुटसुटीत. माणसाने आपल्या बुद्धीने आकाशात झेपावणारी विमानेही बनवली, जहाजही बनवली.

सुरुवातीच्या काळात यात्रेला जाणं, लग्न, मुंजीला जाणं, वाईट प्रसंगात भेटायला जाणं इतपतच मर्यादित होतं. जवळपास पंचक्रोशीत जायचे असेल तर माणसं चालतही जायची. पूर्वी सुटीत प्रवासाला जायचं तर लोक नातेवाईकांकडे राहात असत. तेव्हा त्यांचं एकमेकांना ओझं नव्हतं. तिथे कुठली ठिकाणं बघायची हे ठरलेलं असायचं. तेव्हा खरंतर अपेक्षाही फार नव्हत्या. गावात उन्हाळा असेल तर थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि ताजंतवानं होऊन नव्याने कामाला लागायचं.

परंतु बदलत्या काळात प्रवासाचे आयामही बदलले. केवळ सुटीत कुटुंबासोबत जाणं. एवढ्यापुरतचं मर्यादित न राहता काही नोकरी, व्यवसायच असे आहेत की ज्यासाठी सतत प्रवास करावा लागतो. उदा., विपणन किंवा मार्केटिंग यात विक्रीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. छोट्या वस्तू ते मोठ्या मशीनपर्यंत. संशोधनासाठी विविध भागांत जाऊन लोकांशी संवाद साधला जातो. वैद्यकीय प्रतिनिधी नव्या औषधांची ओळख करून देण्यासाठी जातात. पण हे प्रवास काटेकोर हं, कुठे केव्हा पोचायचे, केव्हा निघायचे, किती दिवस राहायचं हे दुसरं कुणीतरी ठरवतं. काहींना डोंगर, दऱ्या भुरळ घालतात, तर काहींना जंगल, वनांचा मोह पडतो. निसर्ग साद घालतो, समुद्र खुणावत, असे साहसी प्रवास माणसांना आत्मविश्‍वास देतात. निसर्गापुढे आपण किती लहान आहोत याची जाणीव करून देतात.

यानंतर तोचतोचपणापासून, रूटीनपासून बदल हवा म्हणून प्रवास करणे आणि त्यातून ऊर्जा मिळवून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचे. केवळ सुटीत गावाला जायचं ही प्रथा मागे पडून शनिवारी, रविवारी बाहेरगावी जायचं असं सर्रास सुरू आहे. मात्र अजूनही-
“पळती झाडे पाहुया
मामाच्या गावाला जाऊया’

यातला लडिवाळपणा कायम आहे. पळती झाडं बघायला सगळ्यांना आजही आवडतं. काहींनी इतरांना प्रवासाला घेऊन जायचा व्यवसाय सुरू केला. लोकांना प्रवासाची आखणी करून देणे, निवासाची सोय करून देणे की जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा. या सोयीमुळे अनोळखी ठिकाणीही लोक जाऊ लागले, आणि ट्रॅव्हल कंपनीचे लोकही अनवट ठिकाणं शोधू लागले. हल्ली तर अनेकांनी समान आवडीचे गट बनवले आहेत, हो कारण हौसेने प्रवासाला गेल्यावर एखादा कुरकुऱ्या, कटकट्या निघाला तर सगळ्यांच्याच आनंदाचा विचका होतो. मुरूडच्या जंजिऱ्याला होडीत बसून जाण्याची मजा अंगावर रोमांच उभे करते. एखादा गड चढून गेल्यावर खूप काहीतरी कमावल्याचं समाधान मिळते. मन थेट ऐतिहासिक काळात पोहोचतं.

प्रवासावर कविता आहेत-
दख्खनच्या राणीच्या बसून कुशीत
शेकडो पिल्लेही चालली खुशीत

हा दख्खनच्या राणीचा प्रवास आजही छान वाटतो आणि स्टेटस वाढवतो. नंतर लोकांना परदेश खुणावू लागला आणि विमान प्रवासाला महत्त्व आलं. देशातल्या देशातही विमान प्रवासाला महत्त्व आले. परदेश जवळ आले. विमान प्रवास इतक्‍या जवळून ढग बघताना लहान मुलांइतकीच मोठ्ठ्यांनाही मजा वाटते. शाळेच्या ट्रीपबरोबर केलेली धमाल पुढे अनेक वर्षे आठवून त्याचा आनंद घेतला जातो. प्रवास म्हटलं की गप्पाटप्पा, खाणेपिणे, हसणं खिदळणं आणि मजा,ऊर्जा, सहवासाचा आनंद. प्रवासाची खरंच आवड असेल तर हेच वाहन तेच हॉटेल असं काही पाहिलं जात नाही, तर बॅग भरायची अन्‌ निघायचं बस्स्‌. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजा येतसे चातुर्य फार हे मात्र खरं. प्रवास केल्याने माणसं तडजोड करायला शिकतात. अनोळखी व्यक्‍तींशी संवाद साधायला शिकतात.

ज्याने चाकाचा शोध लावला त्याचे आपण जन्मभर ऋणी राहायला हवं. कारण त्याने आपल्या जगण्याला वेगळाच अर्थ दिला. प्रवास करावा. अगदी जरूर करावा. स्वत:ची मोटारगाडी असलेले लोक त्यातून आपल्या सोयी सवडीने प्रवास करतात, पण सार्वजनिक वाहनातून प्रवास करायचीही एक मजा असते. मनोरंजन आणि प्रवास एकत्र ही संकल्पना आली आणि धकाधकीच्या आयुष्यात राहून गेलेलं मनोरंजनही निवांतपणे एन्जॉय करता येऊ लागलं.

नीलम ताटके

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.