पुणे – शहरात करोनाच्या नव्या बाधित संख्येबरोबर आता सक्रीय बाधितांची संख्याही वाढत आहे. मागील दहा दिवसांत सक्रीय बाधितांची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. दरम्यान, रविवार (दि. 29) 400 नवे करोनाबाधित सापडले. तर गेल्या 24 तासांत तिघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 360 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी सक्रीय बाधितांची संख्या तब्बल 18 हजारपर्यंत पोहचली होती. त्यानंतर ही संख्या हळूहळू कमी होऊ लागली. दि.18 नोव्हेंबरपर्यंत शहरात 4 हजार सक्रीय बाधित होते. मात्र, दिवाळी संपली आणि बाधितांबरोबर सक्रीय रुग्णांची संख्या वाढू लागली.
रविवारअखेर शहरात 5 हजार 544 सक्रीय बाधित असून, त्यातील 409 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. 245 बाधित व्हेंटिलेटर तर 164 बाधित अतिदक्षात विभागात उपचार घेत आहे. ऑक्सिजनवरील बाधितांची संख्या 1 हजार 195 इतकी आहे.
बाधितांची संख्या वाढल्याने नमुने तपासणीच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. दिवसभरात 3 हजार 969 जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 8 लाख 17 हजार 152 संशयितांच्या तपासणीत 1 लाख 69 हजार 794 बाधित सापडले. त्यातील 1 लाख 59 हजार 789 जण करोनामुक्त झाले आहेत.