पुणे – राज्यातील प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या (डी.एल.एड.) प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. 30 नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया सुरू असून, 15 डिसेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे अडीच महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया रखडली होती. त्यास शासनाने त्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर ती सुरू झाली.
डी.एल.एड.च्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाइन आक्षेप स्वीकारण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून (डायट) आक्षेपांची पडताळणी होणार आहे. पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी 1 डिसेंबर रोजी दुपारी 1 वा. संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. प्रथम फेरी प्रवेशाची यादी 2 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रवेशासाठी 2 ते 5 डिसेंबर मुदत आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी डायटकडे 5 डिसेंबर रोजी पाठविण्यात येणार आहे.
दुसऱ्या फेरीच्या विकल्प नोंदविण्यासाठी 6 डिसेंबर रोजी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 7 डिसेंबर रोजी यादी जाहीर होणार आहे. 7 ते 10 डिसेंबरदरम्यान प्रवेशासाठी मुदत आहे. डायटकडे विद्यार्थ्यांची यादी 10 डिसेंबरला पाठविण्यात येणार आहे.
तिसऱ्या फेरीसाठी विकल्प नोंदविण्यासाठी 11 डिसेंबर रोजी संधी मिळणार आहे. तिसऱ्या व अंतिम प्रवेश फेरीची यादी 12 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. तर, प्रवेशासाठी 12 ते 16 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. यात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची यादी 16 डिसेंबरला डायटकडे पाठविण्यात येणार आहे. डायटच्या सर्व प्राचार्यांनी जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय झालेल्या प्रवेशाची खात्री करून घेण्यासाठी 17 डिसेंबर रोजी संधी मिळणार आहे.
व्यवस्थापन कोट्याची प्रवेश प्रक्रिया 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबरदरम्यान होणार आहे. अध्यापक विद्यालयांनी या प्रवेशाचे प्रस्ताव संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ऑनलाइन सादर करणे आवश्यक असून त्यासाठी 12 डिसेंबर रोजी संधी आहे. ऑनलाइन आलेले प्रस्ताव तपासण्यासाठी 12 ते 15 डिसेंबर या कालावधीत मुदत आहे.