वडगाव मावळ – मावळ तालुक्यात एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या आता 2 हजार 391 पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात सोमवारी (दि. 7) आणखी 17 रुग्णांची भर पडली. सोमवारी दिवसभरात 48 करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. शहरी भागात नऊ आणि ग्रामीण भागात 8 बाधित रुग्ण आढळले. शहरी भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. शहरी भागात 1318 आणि ग्रामीण भागात 1073 बाधित रुग्ण आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तळेगाव दाभाडे शहरात सर्वाधिक 790 बाधित रुग्ण आहेत. लोणावळा 369 व वडगाव नगरपंचायत 159 रुग्ण आहेत. दिवसभरात तळेगाव दाभाडे शहरात 6 करोना रुग्ण आढळले आहेत. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3 “पॉझिटिव्ह’ मिळाले. वडगाव नगरपंचायत हद्दीत दिवसभरात एकही रुग्ण आढळलेला नाही. कामशेत 2, काले 2, टाकवे बुद्रुक, सोमटाणे, नाणे प्रत्येकी 1 असे एकूण 17 करोना “पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
मावळात सोमवारी लोणावळा येथील 79 वर्षीय पुरुषाचा करोनाने मृत्यू झाला असून, आतापर्यंत 95 मृत्यू झाले आहे. 600 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये 18 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.