- 1269 रुग्णांची भर – 676 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – करोनाने पुन्हा एकदा घातक होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होत होते. परंतु सोमवारी अचानक पुन्हा मृत्यूचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये करोनाने 24 रुग्णांचा बळी घेतला आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांनी 56 हजारांचा आकड़ा पार केला आहे. आज शहरात 1171 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आजपर्यंत शहरात 56493 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 1259 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 10 जणांना करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 17 व शहराबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 6925 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 932 रुग्णांचाही समावेश आहे.
सोमवारी दिवसभरात शहरात 24 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील भोसरी, संभाजीनगर, निगडी, दिघी, पिपंळे निलख, आकुर्डी, थेरगाव, संत तुकारामनगर, शाहूनगर, मासूळकर कॉलनी, खराळवाडी, इंद्रायणीनगर, चिंचवड येथील 17 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील देहूरोड, मावळ, देहूगाव, शिरूर, चिंबळी व पुणे येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 676 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 47077 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3094 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 2598 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.