अमरावती : महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, असे नेहमीच बोलण्यात येते मात्र मेळघाटसारख्या अनेक भागात आजही अंधश्रद्धा कायम आहे. आदिवासी बांधव डॉक्टरांकडे उपचार न करता भोंदूबाबांकडे उपचार घेण्यासाठी प्राधान्य देतात, हे सातत्याने समोर आले आहे. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. तीन वर्षांच्या बालकाला भोंदूबाबाकडून विळ्याने चटके देऊन त्याच्यावर अघोरी पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात ही अमानवी घटना घडली आहे. ताप आल्यावर या बालकाला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेऊन अघोरी उपचार करण्यात आले. या प्रकारानंतर बाळाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संदर्भात अजूनही तक्रार दाखल झालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे मेळघाटातील आदिवासी भागातील अंधश्रद्धेची ही पाचवी घटना आहे.
मेळघाटातील खटकाली गावात तीन वर्षाच्या बालकाला ताप आला होता. आई-वडिलांनी त्याला धामणगाव गडी इथल्या आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथे त्याला बरं वाटत नसल्याने आई-वडिलांनी त्याला रुग्णालयातून भोंदूबाबाकडे नेले. यात अंधश्रद्धेतून भोंदूबाबाने या तीन वर्षांच्या बालकाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिले. त्याची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बालकाच्या पोटावर चटके दिले आहेत, त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणलं. तिथे योग्य उपचार करुन बालकाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमले यांनी दिली. या प्रकरणी बालकाच्या आई-वडिलांचा जबाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.