व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शैक्षणिक संस्थांकडून वेळापत्रकानुसार कार्यवाही होण्याविषयी सांशकता व्यक्त केली जात आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली फेरी 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करावी आणि 15 सप्टेंबरपासून महाविद्यालये सुरू करा, अशा सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिल्या आहेत. एआयसीटीईने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी देशातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर, कृषी, फाइन आर्टस् अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे.

करोनाच्या उद्रेकामुळे सर्व बोर्डाने बारावीची परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. याचप्रमाणे परीक्षेचा निर्णय जून महिन्यात होणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर राज्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहेत. जूनमध्ये परीक्षा झाल्या, तरी त्यांचे निकाल जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अपेक्षित असणार आहेत.

या सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश प्रक्रियाचा निकाल ही ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीईटीचा निकाल जाहीर झाल्यावर, प्रवेश सुरू होणार आहे. त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत महाविद्यालये सुरू करणे अशक्य असल्याचे मत व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणार्‍या संस्थाचालकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शैक्षणिक संस्थांकडून किमान प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी संबंधित वेळापत्रकाची अंमलबजावणी करणे अवघड आहे. त्यामुळे आता राज्यातील शैक्षणिक संस्थांकडून एआयसीटीई कडून या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.