ऑक्‍सिजन टॅंक, कोविड औषधे व उपकरणांवरील कर काढून टाका; ममतांचे मोदींना पत्र

नवी दिल्ली, दि. 9 – केंद्र सरकारने ऑक्‍सिजन टॅंक, कोविडची औषधे व वैद्यकीय उपकरणांवरील कर त्वरीत काढून टाकावेत अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले आहे.

अनेक स्वयंसेवी संस्था, देणगीदाते आणि दानशूर कंपन्यांनी भारताला मोठ्या प्रमाणात कोविडच्या अनुषंगाने मदत देणे सुरू केले आहे. त्यावरील कस्टम ड्युटी आणि जीएसटी केंद्र सरकारने त्वरित काढून टाकली पाहिजे. असा निर्णय घेतला गेला तर राज्यांनाही मोठीच मदत होणार आहे कारण या वस्तुंची प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठ्यात सध्या बरीच तफावत आहे. त्याची पुर्तता करताना राज्य सरकारांना मोठेच कष्ट पडत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मोदींना पाठवलेले हे तिसरे पत्र आहे.

औषधे, कोविडच्या वापरासाठीची उपकरणे यांच्यावर अनेक प्रकारचे कर सध्या लागू आहेत ते काढून टाकले तर परिस्थिती बरीच सुरळीत होण्यास मदत होईल.जीएसटी व कस्टम ड्युटी काढून टाकण्याचा अधिकार केंद्राच्यात हातात आहे. त्यांनी त्यानुसार उपाययोजना केली तर विदेशातून येणारी मदतही त्यातून वाढू शकले असेही त्यांनी म्हटले आहे.

करोना लसीच्या संबंधातही त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले असून या वाटपातील गोंधळाबद्दलही मोदींना जबाबदार धरले आहे. देशातील सर्वांना मोफत लस उपलब्ध करून देणे ही केंद्राचीच जबाबदारी आहे असेही त्यांनी नमूद केले असून त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचीही दरवाजा ठोठावला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.