पिंपरी-चिंचवड : अखेर “ऑटो क्‍लस्टर’मधून “स्पर्श’ची हकालपट्‌टी

  • माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्यात
    “स्पर्श’च्या कर्मचाऱ्यांचा सहभाग;
  • महापालिका आयुक्‍तांचा ठपका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयातून अखेर “स्पर्श’ची हकालपट्टी करण्याचा निर्णय आयुक्तांनी रविवारी (दि. 9) घेतला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्यामध्ये “स्पर्श’च्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, महापालिकेसोबत केलेल्या कराराचा भंग झाल्याचे कारण देत ऑटो क्‍लस्टर येथील व्यवस्थापन अधिग्रहित केले आहे. रुग्णसेवेमध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी ऑटो क्‍लस्टर येथे कोविड समर्पित रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयाला मेडिकल व पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याचा ठेका स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आला होता. या हॉस्पीटलच्या दोन डॉक्‍टरांनी बेडसाठी पैसे घेतल्यामुळे त्यांना अटक झाली आहे. याच मुद्यावर सर्वसाधारण सभेतही मोठा गोंधळ झाला होता.

त्यानंतर महापालिका आयुक्‍तांनी दहा दिवसांत “स्पर्श’वर कारवाईचे आश्‍वासन दिले होते. बेडसाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता स्पर्श हॉस्पीटलच्या वतीने ऑटो क्‍लस्टर येथे “ब्रदर’ म्हणून काम करणाऱ्या अजय बाबाराज दराडे याला रेमडेसिवीर काळ्या बाजारात विकताना अटक करण्यात आली होती.

या दोन्ही प्रकारानंतर महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांवर दबाव वाढविला होता. तसेच ऑटो क्‍लस्टर येथे दुसऱ्या व्यवस्थापनामार्फत अथवा महापालिकेच्या वतीने चालविण्यात यावे, अशी मागणी केली होती. सातत्याने “स्पर्श’च्या व्यवस्थापनाकडून सुरू असलेला अनागोंदी कारभार, मनमानी, रुग्णांच्या सेवेपेक्षा स्वस्वार्थाला दिले जात असलेले महत्त्व आणि बेजबाबदारपणाचा कळस यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अखेर ऑटो क्‍लस्टरमधून “स्पर्श’ची हाकालपट्टी करत या रुग्णालयाचा ताबा रविवारीच घेतला. आयुक्तांच्या या धडाकेबाज निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

आयुक्‍तांचा थोडक्‍यात आदेश
ऑटो क्‍लस्टर येथे सर्व सेवा महापालिकेच्या वतीने मोफत दिल्या जात असतानाही बेडसाठी पैसे स्वीकारणे, रुग्णांसाठी मोफत स्वरुपात उपलब्ध करून दिलेले रेमडेसीवीर इंजेक्‍शनची काळ्या बाजारात विक्री करण्याचे कृत्य “स्पर्श’च्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे. स्पर्श हॉस्पीटल यांचे व्यवस्थापन एकदम निकृष्ट दर्जाचे असून, गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरल्यामुळे व्यवस्थापनाची यामध्ये जबाबदारी निश्‍चित होत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्यामध्ये स्पर्शच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे माझ्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. कायद्याने मला प्राधिकृत केलेल्या अधिकारांचा वापर करण्यास बाध्य झाल्याने स्पर्श हॉस्पीटल चालवित असलेले महापालिकेचे ऑटो क्‍लस्टर कोविड हॉस्पीटल तात्काळ प्रभावाने 9 मे 2021 रोजी अधिग्रहित करीत आहे.

साहित्य जमा करण्याचे आदेश
महापालिकच्या वतीने ऑटो क्‍लस्टर येथे उपलब्ध करून दिलेल्या सर्व पायाभूत सुविधा, वैद्यकीय व इतर उपकरणे, सर्व प्रकारची औषधे, उपभोग्य वस्तू, डेटा व सर्व प्रणाली चाव्यांसह उपलब्ध करून देण्याचे आदेश स्पर्शचे सीईओ डॉ. अमोल होळकुंदे यांना आयुक्तांनी बजाविले आहेत. हे साहित्य जमा करताना कोणतीही बाधा आणू नये असेही आदेशात म्हटले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या वैद्यकीय उपचारामध्ये बाधा पोहोचेल असे कृत्य करून महापालिकेच्या प्रतिमेस हानी पोहोचविल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

स्पर्शला कारणे दाखवा नोटीस
स्पर्श हॉस्पीटलच्या वतीने महापालिकेसोबत केलेल्या कराराचा भंग केला असून, महापालिकेची बदनामी करण्यास ते कारणीभूत ठरले आहेत. तसेच रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्या मानसिक त्रासास आणि उत्पीडणास कारणीभूत ठरल्यावरून महापालिका आयुक्तांनी स्पर्शला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. आपल्या हॉस्पीटलला व अस्थापनेला काळ्या यादीत का टाकू नये? याचा चार दिवसांत खुलासा करण्याचेही आदेश बजाविण्यात आले आहेत.

अधिकारी, डॉक्‍टरांची नियुक्ती
ऑटो क्‍लस्टर येथील स्पर्शचे व्यवस्थापन हटवून महापालिकेने या ठिकाणी स्वत:चे व्यवस्थापन लागू केले आहे. या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांना मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे मुख्य वैद्यकीय समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय डॉ. मनजीत संत्रे, डॉ. संतोष थोरात, डॉ. अतुल देसले, डॉ. शगुन पिसे, डॉ. आनंद करळे यांच्यावर प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच स्पर्श हॉस्पीटकडे जे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने सध्या कार्यरत आहेत त्यांना महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय काम सोडता येणार नाही. त्यामुळे ऑटो क्‍लस्टर येथील रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही आयुक्तांच्या आदेशाने स्पष्ट झाले आहे. येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन यापुढे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीच्या युवराजाचे
प्रयत्नही ठरले असफल
स्पर्शचे व्यवस्थापन भ्रष्ट कारभार करत येथील रुग्णसेवेला बाधा पोहोचवित होते. बेडसाठी पैसे स्वीकारत असून, रेमडेसीवीर काळ्या बाजारात विकत असल्याचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही राष्ट्रवादीच्या एका “युवराजा’कडून स्पर्शच्या सेवेबद्दल आग्रह धरला जात होता. आता आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे युवराजांचे प्रयत्न असफल ठरले असून, यामध्ये राष्ट्रवादीचीही चांगलीच नाचक्की झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील ठेका स्पर्श हॉस्पीटलला गतवर्षी करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देण्यात आला होता. स्पर्शमध्ये काही लोकप्रतिनिधींची छुपी भागीदारी असल्याचे वारंवार समोर आले होते. त्यातच स्पर्शने भोसरी येथील रामस्मृती आणि हिरा लॉन्स येथे कोविड केअर सेंटर उभारल्याचे भासवून महापालिकेकडून 3 कोटी 25 लाख रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर या संस्थेचा ऑटो क्‍लस्टर येथील ठेका काढण्यासाठी आयुक्तांवर दबाव होता.
मात्र, राष्ट्रवादीच्याच एका लोकप्रतिनिधीकडून राष्ट्रवादीच्या युवराजाला दिशाभूल करणारी, गैरसमज निर्माण करणारी माहिती पुरविली जात असल्याने स्पर्शचा ठेका राहिला पाहिजे यासाठी या युवराजांनी चांगलेच प्रयत्न केले होते. वस्तुत: 28 फेब्रुवारी रोजीच या संस्थेसोबतचा करारनामा संपुष्टात आला होता. मात्र युवराजांच्या आशिर्वादाने पुन्हा स्पर्शला मुदतवाढ देण्यात आली. युवराज पाठिशी असल्याने आपले कोणीच काही करू शकत नाही, या भूमिकेत वावरणाऱ्या स्पर्शच्या व्यवस्थापनाला आज आयुक्तांनी दणका दिला. तर चुकीच्या लोकांना पाठिंबा देणाऱ्या युवराजांचीही चांगलीच नाचक्की यामुळे झाली आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीला आणि या युवराजांना “स्पर्श’च्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराची उत्तरे द्यावे लागण्याची शक्‍यता आहे.

तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही – सीमा सावळे
स्पर्श हॉस्पीटलच्या व्यवस्थापनाने महापालिकेची जी लूट चालविली होती, ती थांबविण्यात आज खऱ्या अर्थाने यश आले. चुकीच्या लोकांना आयुक्तांनी यापुढेही पाठिशी घालू नये, अशी प्रतिक्रीया भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली. स्पर्शने महापालिकेला गेल्या वर्षभरात दोन्ही हातांनी लुटले आहे. रुग्णांकडून बेडसाठी पैसे घेतल्याचा प्रकार नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विकास डोळस यांनी समोर आणला. त्यांनी घेतलेली भूमिका निश्‍चित स्वागतार्ह आहे. स्पर्शचा ठेका काढण्यात आला त्याबद्दल महापालिका आयुक्तांचे अभिनंदन. तर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या प्रकरणी लक्ष देऊन तपास केला तसेच दोषींना अटक केली, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. मात्र स्पर्शने केलेल्या इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी झालीच पाहिजे. जोपर्यंत स्पर्शच्या सगळ्या प्रकरणांची चौकशी होत नाही आणि भ्रष्टाचारप्रकरणी स्पर्शवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचेही सावळे यावेळी म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.