पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र 29 जून रोजीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 29 जूनचे पेपर आता 9 जुलैला घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आषाढी एकादशी आणि बकरी ईद असल्याने 29 जूनला होणाऱ्या पेपरबाबत निर्णय घेण्याची मागणी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने 29 जूनला होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या दिवशीचे पेपर आता 9 जुलैला घेतले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी पालखी सोहळ्यामुळे 12 आणि 13 जूनला होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.