दोन दिवसांत निवडणूकीची घोषणा

मुख्य निवडणूक आयुक्त दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर : बुधवारी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक
मुंबई: महाराष्ट्रातील निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राचा आढावा घेतल्यानंतर आयोगाचे सदस्य लगेच नवी दिल्लीला परतणार आहेत. गुरुवारी, 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचा नाशिक येथे समारोप होणार आहे. या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांची सभा संपताच रात्री उशिरापर्यंत अन्यथा शुक्रवारी विधानसभा निवडणूकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे, अशी खात्रीशीर माहिती निवडणूक आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची राजकिय पक्षांबरोबरच सर्वसामान्य मतदारांमध्येही उत्सुकता वाढली असतानाच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा उद्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर बुधवारी सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यातील निवडणूकीच्या तयारीचा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी मान्यताप्राप्त राजकिय पक्षांबरोबरच पोलीस अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनाही चर्चेला बोलावण्यात आले आहे.

राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. या तयारीची माहिती भारत निवडणूक आयोग घेणार आहे. त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा, आयोगाचे चार उपनिवडणूक आयुक्त तसेच महासंचालक उद्या संध्याकाळी मुंबईत दाखल होत आहेत.
आयोगाने 18 सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली आहे. बैठकीत निवडणुकीच्या तयारीसह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती आयोगाचे अधिकारी घेतील. बैठकीला सर्व जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीच्या तयारीची माहिती घेतल्यानंतर आयोगाचे अधिकारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.

मान्यताप्रप्त भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, मनसे आदींना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. महाराष्ट्राबरोबरच हरयाणा व झारखंड येथेही विधानसभेची निवडणूक होणार आहे. आयोगाने याआधी हरियाणा राज्यात जाऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे.

निवडणूकीचा कार्यक्रम लांबला
2009 व 2014 च्या निवडणूकीचा विचार करता 2019 च्या निवडणूकीची घोषणा लांबली आहे. बाराव्या विधानसभेची घोषणा 31 ऑगस्ट 2009 रोजी, तर 12 सप्टेंबर 2014 रोजी तेराव्या विधानसभेची घोषणा करण्यात आली होती. नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान 35 दिवसांचा कालावधी आवश्‍यक आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ऐन दिवाळीच्या आसपास मतदान होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.