कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2019 चा राजर्षी शाहू पुरस्कार प्रख्यात समाज सेवक आणि गांधीवादी कार्यकर्ते अण्णा हजारे यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केले.
यावेळी जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, महानगरपालिकचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. राणी ताटे, राजदिप सुर्वे, शाहू स्मारकचे व्यवस्थापक कृष्णाजी हारूगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंती निमित्त समाज कार्य, समाज प्रबोधन, साहित्य कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रिडा इत्यादी क्षेत्रात दिर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिस अथवा संस्थेस सन 1984 पासून राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल, व्ही शांताराम, डॉ. बाबा आढाव, तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गुरु हनुमान, साथी नानासाहेब गोरे, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, भाई वैद्य, शरद पवार, पुष्पा भावे आदींना प्रदान करण्यात आला आहे. सन 2019 चा 34 वा राजर्षी शाहू पुरस्कार प्रख्यात समाज सेवक अण्णा हजारे यांना दिनांक 26 जून रोजी शाहू स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
अण्णा हजारे यांनी देशाच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये 1980 नंतर फार मोठे योगदान दिले आहे. नगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी येथे ग्रामविकासाचे आणि जल नियोजनाचे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत. भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार मिळवून देण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. लोकायुक्त आणि लोकपाल यांची नियुक्ती व्हावी यासाठी त्यांनी अनेक वर्ष निकराचे प्रयत्न केले आहेत. अण्णांनी महात्मा गांधीच्या ग्रामविकास, स्वावलंबन, साधी राहणी, अन्याया विरुध्द सतत संघर्ष करणे, उपोषण आणि सत्याग्रह या विचार सुत्राचा अवलंब केल्यामुळे त्यांना श्रेष्ठ गांधीवादी कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. अण्णांचे संपूर्ण जीवन त्यागमय असून महात्मा गांधीच्या सत्य अहिंसा, असंग्रह आणि ब्रम्हचर्य या सुत्रांचे पालन त्यांनी केले आहे.
अण्णांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तमिळनाडुच्या गांधीग्राम सरल युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट (डी. लिट) ही पदवी दिली आहे. भारत सरकारारने त्यांच्या पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला आहे. तसेच त्यांना वर्ल्ड बँकेचा, जिट गिल मेमोरियल अवॉर्ड, महाराष्ट्र सरकारचा कृषीभूषण पुरस्कार, भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार, केअर इंटरनॅशनल पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा विकास त्यांनी आपल्या कार्याद्वारे केला आहे.
अशा प्रकारचे महनीय कार्य केलेल्या श्री. अण्णा हजारे यांच्या सारख्या गांधीवादी समाजसेवकाला हा पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टच्या विश्वस्तांच्या बैठकीमध्ये एकमताने घेणेत आला आहे. राजर्षी शाहू पुरस्काराचे स्वरुप हे 1 लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे असून हा पुरस्कार राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे बुधवार 26जून 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता मुख्य सभागृह शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
दिनांक 21 जून 2019 ते 25 जून 2019 या कालावधीत राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्ताने दिनांक 24 जून पर्यंत विविध व्याख्यानांचा कार्यक्रम दररोज सायंकाळी ठिक 6 वाजता तसेच दिनांक 25 जून 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता राजर्षी शाहूरायांना शाहिरी मुजरा हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या व्याख्यानमाला व शाहीरी मुजरानंतर दिनांक 26 जून 2019 रोजी राजर्षी शाहू जयंती व राजर्षी शाहू पुरस्कार वितरण समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.