पुरंदरमध्ये झपाट्याने वाढतोय लम्पीचा संसर्ग : लसीकरणावर भर
बेलसर –जनावरांतील लम्पी रोगाने थैमान घातले असल्याने सध्या जनावरे “लॉकडाऊन’मध्ये आहेत की काय असे वातावरण निर्माण झाले आहे. पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये आतापर्यंत अंदाजे 1200 ते 1300 जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी लसीकरण मोहीमच हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील सर्वांत पहिले मोफत लसीकरण करणारे गाव म्हणून बेलसर गाव समोर आले आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी ग्रामपंचायत बेलसर यांच्यामार्फत संपर्क साधला असता त्यांच्याकडे पूर्ण मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण प्रशासनामार्फत केले जाऊ शकत नाही तर त्यासोबतच शासनाकडे पुरेसा लसींचा साठा नसल्याने ग्रामपंचायत त्यासोबतच बेलसरमधील सर्व दूध संकलन केंद्र यांच्यामार्फत लस्सींची उपलब्धता करून बेलसरमधील सर्व गायी, म्हशी, बैल यांना लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतचे उपसरपंच धीरज जगताप यांनी दिली.
बेलसरमध्ये जवळपास 2500 गायी वर्गीय जनावरे आहेत. त्यामध्ये रविवारी (दि. 11) जवळपास 1200 ते 1300 जनावरांना लसीकरण पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांच्या व खासगी डॉक्टरांच्या मदतीने करण्यात आले. त्यामध्ये गायी, बैल म्हशींचाचा समावेश आहे.
वाड्यावर जाऊन प्रत्येक घरापर्यंत जनावरांना लसीकरण करण्यासाठी पशुवद्यकीय विभागाम सोबतच खासगी डॉक्टरही सक्रिय काम करत आहेत. यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत पाच डॉक्टरांची टीम बेलसरमध्ये दाखल झाली आहे त्यांच्यामार्फत बेलसरमध्ये वाड्यावर जाऊन लसीकरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
लसीकरणासाठी भोईटे, हिंगणे, जगताप, होले आदीं डेअरींसह स्थानिक डॉ. सोमनाथ जगताप, डॉ.अमोल जगताप यांनीही शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. यावेळी बेलसरचे सरपंच अर्जुन धेडे, उपसरपंच धीरज जगताप, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत हिंगणे, संभाजी गरुड, उमेश हिंगणे, पोपट जगताप, अनिल गरुड, हनुमंत जगताप, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश बूधे, तुषार कुदळे हे उपस्थित होते.
खेडच्या 10 गावांत लम्पीचा संसर्ग
अजय चव्हाणांकडून स्वखर्चातून 750 जनावरांचे लसीकरण
राजगुरूनगर – खेड तालुक्यात लम्पी आजाराचा संसर्ग वाढला आहे जवळपास दहा गावात हा संसर्ग पसरला आहे. दरम्यान, तिन्हेवाडी (ता. खेड) परिसरातील जनावरांचे लम्पी आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी शासनाकडून येणाऱ्या लसीवर अवलंबून न राहता सातकरस्थळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजय चव्हाण यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून 750 जनावरांना लस उपलब्ध करून त्याचे दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन लसीकरण सुरु केले आहे.
लम्पी आजारांपासून शेतकऱ्यांच्या पशुधनाचे सरंक्षण व्हावे यासाठी त्यांना प्रतिबंधात्मक लस देणे गरजेचे आहे; मात्र शासनपातळीवर लस उपलब्ध नसल्याने पशुधन पालकांवर मोठे संकट आले आहे. पशुधन पालकांची गैरसोय होऊ नये. जनावरांचे लम्पी आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी सेवाभावी संस्था, नागरिकांच्या पुढाकाराने खासगी लसीकरण सुरु झाले आहेत.
सातकरस्थळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजय चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तीन खासगी जनावरांच्या डॉक्टरांच्या माध्यमातून 750 जनावरांना लसीकरण केले आहे. लसीकरणासाठी या परिसरातील सचिन महाराज आरुडे, नानाभाऊ आरुडे, धोंडीभाऊ आरुडे, रामदास पाचरणे, संतोष पाचारणे, सुभाष करमारे, श्याम सांडभोर यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून लसीकरण करण्यास सहकार्य केले. डॉ. स्वप्निल पाडेकर व संभाजी तांबे आणि प्रशांत शेळके यांनी लसीकरण केले. तालुक्यातील पुढारी मंडळींना असेच लसीकरणाचे कॅम्प गावोगावी आयोजित करण्याचे आवाहन अजय चव्हाण यांनी केले आहे.