Anil Deshmukh : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच बुधवारी पुण्यात शरद पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. ही बैठक तब्बल दोन तास चालली. या बैठकीतून बाहेर पडलेल्या मंगलदास बांदल यांनी दिलेल्या माहितीमुळे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
काय म्हणाले अनिल देशमुख ?
“राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्यच्या बातम्या चुकीच्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र राहील. जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या जातायत अस वाटते. या बातम्या कोण पेरतंय याचा शोध घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमधे सत्यता नाही. आम्ही स्वतंत्र चिन्ह घेऊन लढण्याच्या तयारीत आहोत. महाविकास आघाडीकडून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढणार आहोत. आम्ही कोणासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला लवकरात लवकर चिन्ह मिळावं यासाठी आम्ही आग्रही आहोत. ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येईल. लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत,”असे अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रशांत जगताप काय म्हणाले ?
शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “आज सकाळी बैठकीत सुप्रिम कोर्टाच्या निकालावर चर्चा झाली. शरद पवार गटाचे काँग्रेस मध्ये विलीगीकरण होणार नाही. ते पुढे म्हणाले ज्यांना पवार साहेब यांची भीती आहे ते अफवा पसरवून मोकळे झाले, तसेच या बैठकीत येत्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजनाबाबत चर्चा करण्यात आहे.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. शरद पवार यांनी बुधवारी सकाळी राज्यभरातील नेते, खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या पक्षाला येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे, अशी आमची मागणी आहे.”