नवी दिल्ली – संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. यादरम्यान सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. एका सदस्याने सुक्ष्म, व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांना इंग्रजीतून प्रश्न विचारला. तो न कळल्याने राणे यांनी भलतेच उत्तर दिले. त्यामुळे त्यांची आज राज्यसभेच चांगलीच गडबड उडाल्याचे पहायला मिळाले. भाजपचे खासदार कार्तिकेयन यांनी त्यांना कामगारांच्या कल्याणासाठी लघू आणि सुक्ष्म उद्योग क्षेत्राने काय उपाययोजना केली असा प्रश्न विचारला होता.
त्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने निर्यातिसाठी कसा प्रयत्न सुर केला आहे, आणि उद्योग क्षेत्रात मेड ईन इंडियाला कशी चालना दिली जात आहे अशा स्वरूपाची काही माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सभागृहातील सदस्यही अवाक झाले. त्यांची कुजबुज सुरू झाल्यानंतर राज्यसभेत गोंधळ वाढला.
त्यावेळी मंत्र्यांना प्रश्नच कळला नसल्याची बाब अध्यक्ष स्थानी असलेले हरिवंश यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राणे यांना हिंदीतून हा प्रश्न समजाऊन सांगितला. त्यानंतरही सभागृहातील गोंधळ कायम राहिल्यानंतर राणे संतापले.
नेमकं काय झालय हे न समजल्याने राणे काहीसे आक्रमक झाले आणि कारखाने सुरू झाले नाहीत तर कामगारांचे प्रश्न सुटतील काय असा उलट सवाल करीत खासदारांना सुनावले. पण या एकूणच विषयात इंग्रजीतील प्रश्न न समजल्यामुळे मंत्र्यांची गडबड झाल्याचे दिसून आले.