वीसगाव खोरे (वार्ताहर) – बारामती लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपासून राजकारणात घडामोडींनी वेग घेतला आहे.विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि बारामती हायटेकच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र, भोर विधानसभा मतदारसंघातील राज्याचे माजी मंत्री, काॅंग्रेस पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ नेते अनंतराव थोपटे केंद्रबिंदू होतांना दिसत आहेत.
त्यांच्या विचाराने, कृतीने ठाम आणि एकनिष्ठतेमुळे गेल्या महिनाभरापासून खासदार सुप्रिया सुळे, उमेदवार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी माळवाडी येथे जाऊन त्याची भेट घेतली.
या नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षीही मतदारसंघातील असलेले वर्चस्व, त्यांची विचारांची बांधिलकी जोपासणारे मतदार ही त्यांची ताकद असल्याने त्यांचा राजकीय करिश्मा आजही कायम आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहिलेल आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आणि एकनिष्ठ नेते म्हणून अनंतराव थोपटे यांचे नाव आदराने घेतले जात आहे.
अनंतराव थोपटे कॉग्रेसची विचारधारा असलेले जिल्ह्यातील एकमेक ज्येष्ठ नेते असून राज्याच्या राजकारणात त्यांचे नेतृत्व जादूई करिश्मा करेल, असा विश्वास असल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांबरोबर महायुतीच्या घटकपक्षांचे नेते, उमेदवारही त्यांची भेट घेत आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहून पुरोगामी विचारांशी कधीही तडजोड न करणारे नेते म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांचा आशिर्वाद आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी त्यांच्या घरी नेत्यांची रीघ लागली आहे.
अनंतराव थोपटेे हे भोर विधानसभा मतदारसंघातून १९७२, १९८०, १९८५, १९९०, १९९५ आणि २००४ असे सहावेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. १९९९ सालातील निवडणुकीत ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथराव खुटवड यांनी त्यांचा पराभव केला होता. तसेच अनेक वर्षे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्रीपद भूषवली आहेत. त्यांचा राजकीय दबदबा आजही कायम आहे.
अनंतराव थोपटे यांची एकनिष्ठा आणि पुरोगामी विचारसरणी यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सद्यस्थितीत राज्यातील अनेक पक्षांचे नेते त्यांच्याकडे येऊन आपल्या फायद्यासाठी त्यांना जुन्या आठवणींना उजाळा देत जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु अनंतराव थोपटे आपल्या एकनिष्ठ विचारसरणी मुळे ते स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीही तडजोड करणार नसल्याचे बोलले जात आहे. अनंतराव थोपटे हे ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतील तोच बारामतीचा खासदार आणि भोरचा आमदार होतील अशी भावना भोरमधील मतदार व्यक्त करीत आहेत.
वडिलांप्रमाणे संग्राम यांचेही वर्चस्व
२००९ साली अनंतराव थोपटे यांनी मुलगा संग्राम थोपटे यांना राजकारणात आणले आणि आमदारही केले. तेंव्हापासून संग्राम थोपटे हे २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आमदार संग्राम थोपटे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच कृषी उत्पन्न बाजार समिती, साखर कारखाना, खरेदी विक्री संघ,विविध कार्यकारी सोसायटी, दुध सोसायटी, भोर नगरपालिका,ग्रामपंचायत अशा विविध संस्थांवर वर्चस्व राखले आहे.