पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पर्यायी आर्थिक स्रोत शोधण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यासाठी अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली.
अधिसभेच्या दुसऱ्या दिवशी सदस्य जयंत काकतकर यांनी “विद्यापीठांमध्ये उत्पन्नांचे पर्यायी स्रोत शोधून त्यावर कार्यवाही करण्यासाठी समिती स्थापन करावी,’ असा प्रस्ताव मांडला. विद्यापीठाचा खर्चाचा भार वाढत असल्याने आर्थिक स्रोत घटले आहेत. विद्यापीठ आर्थिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विद्यापीठात विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेताना प्राध्यापकांना विना मोबदला एजन्सीसाठी काम करावे लागते. त्यामुळे अशा एजन्सीला काम देऊ नये, असा प्रस्ताव डॉ. सुनील लोखंडे यांनी मांडला. यावर डॉ. गोसावी म्हणाले, “एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन ही विद्यापीठाचीच एजन्सी प्रवेश परीक्षेचे काम पाहते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून 170 रुपये शुल्क आकारले जाते. यामध्ये गैर काहीच नाही, असे स्पष्टीकरण दिले. ‘
“अमृतमहोत्सव निधी’ उभारावा
विद्यापीठाचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने “अमृतमहोत्सव निधी’ उभारण्याची मागणी सदस्य विनायक आंबेकर यांनी केली. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांकडून देणगी मिळविता येईल का, हे पहावे. तसेच प्रत्येक अधिसभा सदस्याने पाच माजी विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलावी, असेही आंबेकर यांनी सुचवले.3
“विद्यापीठाला देश-परदेशांतून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. विविध घटकांशी बोलणी सुरू आहे. विद्यापीठातील संशोधन आणि रॅंकिंग वाढवण्यासाठी जास्त खर्च आवश्यक आहे.”- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ